आंतरराष्ट्रीय

पाकमध्ये होळी खेळल्याने हिंदू डॉक्टरचा गळा चिरला

दिनेश चोरगे

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंधमधील हैदराबाद येथे एका हिंदू डॉक्टरची त्यांच्या ड्रायव्हरनेच गळा चिरून हत्या केली. डॉक्टर होळीत रंग खेळल्याचा राग ड्रायव्हरला होता. डॉ. धरम देव राठी हे घरी एकटेच राहत असत. दोन वर्षांपूर्वी आरोग्य विभागातून ते निवृत्त झाले होते. मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री त्यांचा ड्रायव्हर हनीफ लेघारी याने त्यांचा गळा चिरला.

मृत्यूपूर्वी काही मित्रांसह डॉ. राठी यांनी होलिकोत्सव साजरा केला होता. हनीफ त्यामुळे चिडलेला होता. डॉ. राठी यांचा स्वयंपाकी दिलीप ठाकूर यावेळी घरातच होता. त्याने पोलिसांना ही बाब कळविली. हनीफचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक अमजद शेख यांनी सांगितले. डॉ. राठी रंग खेळल्यानंतर परतले तेव्हा हनीफ याने त्यांच्याशी वाद घातला होता. पाकिस्तानात हे असे चालणार नाही, असेही तो म्हणाला होता. यालाही अमजद शेख यांनी दुजोरा दिला. डॉ. राठी यांची पत्नी आणि मुले अमेरिकेत राहतात. काही दिवसांनी डॉ. राठीही अमेरिकेत शिफ्ट होणार होते.

SCROLL FOR NEXT