आंतरराष्ट्रीय

पाकमध्ये भारताच्या पाचपट महागाई : इम्रान खान

दिनेश चोरगे

लाहोर; वृत्तसंस्था :  आपल्या देशाचा महागाई दर भारताच्या 5 पट आहे. सरकार देशाला या संकटातून वाचवू शकत नाही आणि तसा प्रयत्न करू इच्छित नाही, असे प्रतिपादन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले.
मी दहशतवादी नाही, माझ्यावर दहशतवादाचे 40 खटले विनाकारण दाखल करण्यात आले. आर्थिक कोंडीतून पाकिस्तानची मुक्तता करण्याची शाहबाज सरकारची इच्छाच नाही, असेही ते म्हणाले. लाहोर येथील मिनार-ए-पाकिस्तान परिसरात त्यांची सभा झाली.

इम्रान खानचे हात बांधणे म्हणजे निवडणुकीस समान संधी असा अर्थ होत नाही. आमच्या पक्षावर 150 गुन्हे दाखल केलेले आहेत. आम्हाला बाजूला सारण्यासाठी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचे सरकार असे करीत आहे, असेही इम्रान खानने म्हटले आहे. या सभेत सामील झालेल्या हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले, ही कसली लोकशाही आहे. येथे माझ्या आणि पक्षाच्या विरोधात कारस्थाने करून सत्तेतून घालवण्यात आले. आता विनाकारण दहशतवादाचे 40 खटले दाखल केले आहेत, या देशातील जनतेला इम्रान खान दहशतवादी असल्याचे पटते का? नवीन सरकार गुन्हेगारांनी भरलेले आहे. देशात कायद्याचे राज्य असेल तेव्हाच जनतेला स्वातंत्र्य मिळेल.
यादरम्यान माजी पंतप्रधानांनी त्यांची 10 कलमी योजना जनतेला सांगितली.

आपण इतर देशांमध्ये राहणार्‍या पाकिस्तानी लोकांना येथे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. जेणेकरून सतत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कोणाला जावे लागणार नाही. याशिवाय जे लोक आपली उत्पादने निर्यात करू शकतील आणि डॉलर देशात आणू शकतील अशा सर्व घटकांना आम्ही सुविधा देऊ. पर्यटन आणि खनिज क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सत्तेत आल्यानंतर चीनच्या सहकार्याने कृषी उत्पादकता वाढवू, असेही इम्रान खान म्हणाले.

SCROLL FOR NEXT