बर्लिन; वृत्तसंस्था : जर्मनीत मोठा रासायनिक हल्ला घडविण्याचा कट उधळून लावण्यात आला. याप्रकरणी दोघा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही इराणचे नागरिक असून ते सख्खे भऊ आहेत. त्यांना दक्षिण राईन वेस्टफेलिया परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. ते दोघे कट्टर इस्लामिक आहेत. जर्मनीत त्यांना एमजे आणि जेजे म्हटले जाते. या दहशतवाद्यांच्या घरातून सायनाईड आणि रिसिन यांसारखी घातक रसायने जप्त करण्यात आली.
घातक रसायनांचा वापर करून मोठा हल्ला करण्याचे या दोघांचे मनसुबे होते. रिसिनने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केला तर काही क्षणात त्याचा मृत्यू होतो. रिसिन सायनाईडपेक्षा 6 हजार पट घातक रसायन आहे. अमेरिकेच्या एफबीआयकडून संभाव्य हल्ल्याची माहिती जर्मनीच्या सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली होती. यासंबंधीचे चॅटिंग एफबीआयला टेलिग्राफवर सापडले होते. यामध्ये दोघे जण बॉम्ब आणि घातक रसायने तयार करण्याबाबत बोलत होते. माहिती मिळाल्यानंतर तत्काळ जर्मनीच्या सुरक्षा दलांनी घरी जाऊन दोघांना ताब्यात घेतले.