आंतरराष्ट्रीय

ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे छायाचित्र जारी

Arun Patil

रोम; वृत्तसंस्था : रोममधील बॅम्बिनो गेसू रुग्णालयातर्फे कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' या नव्या व्हेरियंटचे छायाचित्र जारी करण्यात आले असून, इटलीतील एका संशोधकाने ते तयार केले आहे. थ्री-डी छायाचित्रातून 'डेल्टा' आणि 'ओमायक्रॉन' व्हेरियंटमध्ये म्युटेशन्सच्या (बदल) बाबतीत तुलनाही करण्यात आली. मानवी पेशीच्या हिशेबाने स्वत:त अधिकाधिक अनुकूल बदल करण्यात आजवर आढळलेल्या व्हेरियंटस्मध्ये 'ओमायक्रॉन' अव्वल ठरला आहे.

रोम : इटलीच्या शास्त्रज्ञाने कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' विषाणूचे तयार केलेले थ्री-डी छायाचित्र.

'ओमायक्रॉन'मध्ये 'डेल्टा'च्या तुलनेत किती तरी अधिक म्युटेशन्स झालेले आहेत. 'ओमायक्रॉन'मध्ये जास्तीत जास्त म्युटेशन्स मानवी शरीरातील पेशींशी संपर्क साधणार्‍या स्पाईक प्रोटिनच्या भागात आहेत, हे विशेष! अर्थात यातून 'ओमायक्रॉन' हा अधिक घातक विषाणू आहे, असा अर्थ काढण्याची घाई कुणीही करू नये.

माणसाच्या हिशेबाने कोरोना विषाणू स्वत:ला अधिकाधिक अनुरूप बदल करून घेत आहे, इतकाच अर्थ आपण 'ओमायक्रॉन'च्या या म्युटेशन्समधून सध्या घ्यायचा आहे. विषाणूतील हा बदल अधिक घातक आहे की कमी घातक आहे, हे पुढील संशोधनातून समोर येणार आहे.

म्युटेशन म्हणजेच मानवी पेशींच्या अनुषंगाने विषाणू स्वत:मध्ये करतो ते बदल होय. विषाणूच्या स्पाईक प्रोटिनमधील भडक लाल भाग हा सक्रिय भाग म्हणून ओळखला जातो. हा भाग मानवी पेशींशी संपर्क साधतो. 'ओमायक्रॉन'च्या याच सक्रिय भागात जास्त म्युटेशन्स पाहायला मिळतात. बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये आढळलेल्या व्हेरियंटच्या जिनोम सिक्‍वेन्सिंगच्या अध्ययनातून छायाचित्र साकारले गेले आहे.

'ओमायक्रॉन'वर लसीबद्दल साशंकता का?

– सुरुवातीच्या काळात बोत्सवानात आढळलेल्या 'ओमायक्रॉन'च्या चारही रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले होते.
– कोरोना प्रतिबंधक लसी चीनच्या वुहानमधून निघालेल्या मूळ कोरोना विषाणूला समोर ठेवून बनवण्यात आल्या आहेत.
– मूळ विषाणूच्या तुलनेत 'ओमायक्रॉन' किती तरी वेगळा आहे. याच्या स्पाईक प्रोटिनमधील म्युटेशन्समुळे लसीला तो चकवा देऊ शकतो.

म्युटेशन्स तर दिसले; पण त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट व्हायची आहे. या एकूण म्युटेशन्सचा लसीच्या परिणामकारकतेवर प्रभाव पडतो की नाही, हे प्रयोगशाळेतच समोर येईल.
– क्‍लॉडिया ऑल्टेरी, विषाणू संशोधक, रोम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT