लेह (लडाख); वृत्तसंस्था : भारत-चीन सीमेवर दीर्घकाळापासून तणाव सुरू आहे. आता अक्साई चीनमध्ये चीनने आपले लष्करी प्रशिक्षण सुरू केले आहे. कमांडरस्तरीय बैठकीत भारताने याला हरकत नोंदविली आहे. शुक्रवारी लडाखमध्ये दोन्ही देशांदरम्यान पुन्हा एकदा सीमेवरील तणाव संपविण्यासंदर्भात चर्चा झाली. यादरम्यान हवाई हद्दीच्या उल्लंघनाचा मुद्दाही चर्चेला आला.
आपापल्या भागांची ओळख परस्परांना नेमकेपणाने व्हावी म्हणून दोन्ही देशांनी तशी चिन्हे स्पष्ट करण्यावरही या चर्चेत भर देण्यात आला. आजवर दोन्ही देशांदरम्यान अनेक बैठका झालेल्या आहेत; पण तोडगा काही निघालेला नाही. गेल्या महिन्यातही सोळावी बैठक तब्बल 13 तास चालली होती; पण हाती काहीही लागले नाही. संयुक्त निवेदनात मात्र दोन्ही देशांकडून लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) शांतता प्रस्थापित करण्याच्या द़ृष्टीने ही चर्चा उपयुक्त ठरल्याचे सांगण्यात आले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चिनी लढाऊ विमान भारतीय जवानांच्या तळाजवळून गेले. भारतीय हवाई दल सक्रिय (क्षेपणास्त्राचा रोख या विमानाकडे करताच) होताच या विमानाने पळ काढला होता. नंतर ते दिसले नाही. भारताने शुक्रवारच्या चर्चेत या घटनेचा आवर्जून उल्लेख केला. भविष्यात असा प्रकार भारत सहन करणार नाही, असा इशाराही चीनला देण्यात आला.