Zohran Mamdani NYC Mayor:
अमेरिकेतील महत्वाचे शहर न्यूयॉर्क सीटीच्या महापौरपदी डेमॉक्रेटिक पक्षाचे झोहरान ममदानी यांची निवड झाली आहे. ते न्यूयॉर्क शहराचे पहिले भारतीय अमेरिकन मुस्लीम महापौर ठरले आहेत. ३४ वर्षाच्या ममदानी यांनी जोरदार कॅम्पेन केलं होतं. अमेरिकेची आर्थिक राजधानी म्हणून न्यूयॉर्क सिटीकडं पाहिलं जातं. अनेक वर्षांनंतर न्यूयॉर्क शहरात एक लिब्रल विचाराचे महापौर झाले आहे.
ममदानी यांनी माजी महापौर अँड्र्यू क्युमो आणि रिपब्लिकन पक्षाचे कर्टीस स्लिवा यांचा पराभव केला. ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम महापौर झाले आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिले दक्षिण आशियाई, आफ्रिकेत जन्मलेले महापौर देखील ठरले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी न्यूयॉर्कचे आतापर्यंतचे सर्वात तरूण महापौर होण्याचा मान देखील पटकावला आहे. ते १ जानेवारीपासून कार्यभार सांभाळणार आहेत.
सुरूवातीच्या निकालांमध्ये डेमॉक्रेटिक पक्षाच्या नॉमिनेशनवर लढणारे झोहरान ममदानी न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीत आघाडीवर होते. सुरूवातीच्याच टप्प्यात १.७ मिलियन लोकांनी मतदान केलं होतं. हे गेल्या तीन दशकातील या शहरातील सर्वोच्च मतदान होतं. ममदानी यांच्या समर्थकांनी घरोघरी जात मतदानाच्या शेवटच्या घटकेपर्यंत अथक प्रयत्न केले होते. न्यूयॉर्क शहर हे दिवसेंदिवस महागडं शहर होत होतं. निवडणुकीत हाच कळीचा मुद्दा ठरल्याचं जाणकारांचं मत आहे. ममदानींनी याच मुद्द्याभोवती निडवणूक फिरवली होती.
विशेष म्हणजे या निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील रस दाखवला होता. त्यांनी मतदारांना एकप्रकारे धमकीच दिली होती. मात्र ममदानींनी निवडणुकीवरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही.