पुढारी ऑनलाईन डेस्क : २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि संपूर्ण जग चिंतचे खाईत लोटले गेले. प्राथमिक टप्प्यात या युद्धाची तीव्रता भीषण होती. चिमुकल्या युक्रेनने बलाढ्य रशियाला चिवट झुंजही दिली. मागील तीन वर्ष सुरु असणारा हा संघर्ष आता अमेरिकेतील सत्ता बदलानंतर संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या दबावादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासमोर नवा प्रस्ताव ठेवण्याचे संकेत दिले आहेत. (Russia-Ukraine conflict)
ब्रिटननमधील वृत्तपत्र द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, आम्ही युद्ध टाळण्यासाठी रशियासोबत प्रदेशांची अदलाबदल करण्यास तयार आहेत. रशियासोबतच्या संभाव्य शांतता चर्चेत, आम्ही व्लादिमीर पुतिन यांना रशियाच्या कुर्स्क प्रदेशात सहा महिन्यांपूर्वी युक्रेनने ताब्यात घेतलेला प्रदेश परत करण्याची ऑफर देऊ.
काही लोक म्हणतात की, युरोप अमेरिकेशिवाय युक्रेनला सुरक्षेबाबतची हमी देऊ शकतो; पण मला असे वाटत नाही. अमेरिकेशिवाय सुरक्षा हमी खऱ्या सुरक्षा हमी असू शकत नाहीत. युरोप युक्रेनच्या युद्ध प्रयत्नांचा भार एकट्याने उचलू शकत नाही. अमेरिकेने युक्रेनला सुरक्षेची हमी देणे महत्त्वाचे आहे, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.
कुर्स्क प्रदेश परत देण्याचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आम्ही देवू. आमच्यासाठी सर्व क्षेत्रे महत्त्वाची आहेत. आम्ही एका क्षेत्राच्या बदल्यात दुसरे क्षेत्र देऊ, असेही झेलेन्स्की यांनी यावेळी सांगितले. रशियाने युक्रेनचे क्रिमिया, डोनेत्स्क, खेरसन, लुहान्स्क आणि झापोरिझिया हे पाच प्रदेश आपल्या ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे.
रशियासोबतच्या कोणत्याही करारासाठी अमेरिकेकडून सुरक्षा हमी हवी, अशी मागणीही झेलेन्स्की यांनी केली आहे. कठोर लष्करी वचनबद्धतेशिवाय केलेला कोणताही करार रशियाला पुन्हा संघटित होण्यास आणि नवीन हल्ल्यासाठी पुन्हा सशस्त्र होण्यास वेळ देईल. अशा परिस्थितीत युक्रेनला अमेरिकेकडून हमी मिळायला हवी, अशी अटही त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून घातली आहे.