वॉशिंग्टनः एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीबाबत नेहमीच ‘अमक्या देशाला पडलेले एक सुंदर स्वप्न’ असे शब्दप्रयोग केले जात असतात. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत ‘अमेरिकेला पडलेले एक दुःस्वप्न’ असे म्हणता येईल का? ते काही का असेना; पण या प्रेसिडेंट महाशयांना त्यांच्या स्वप्नांमधून जागे करण्यासाठी एका तरुणीला कामावर ठेवले तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, सोशल मीडियावर याबाबतच्या अफवा वेगाने पसरत आहेत.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांच्या मागे एक महिला उभी असल्याचे दिसत आहे. दावा केला जात आहे की, ट्रम्प यांना झोपेतून जागे करण्यासाठी या तरुणीला कामावर ठेवण्यात आले आहे. यापूर्वी ट्रम्प हे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची अनेकदा खिल्ली उडवत होते आणि त्यांना वारंवार ‘स्लीपी जो’ असं म्हणत होते. मात्र, आता खुद्द ट्रम्प हेच कामाच्या ठिकाणी झोपत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक नवा दावा वेगाने व्हायरल होत आहे. त्यानुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एका विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. या महिला कर्मचाऱ्याचे काम बैठकीदरम्यान ट्रम्प यांना डुलकी लागल्यास त्यांना जागे करणे असल्याचे सांगितले जात आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, अनेक नेटकऱ्यांनी असा दावा केला आहे की, या महिलेकडे एक बजर आहे. ट्रम्प यांना झोप येत असल्याचे दिसल्यास ती हे बजर दाबते, असे म्हटले जात आहे. १० ऑगस्ट रोजी ओव्हल ऑफिसमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांना झोप अनावर होत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विचित्र अफवांना सुरुवात झाली आहे. काही प्रेक्षकांच्या लक्षात आले की, ट्रम्प यांना जेव्हा डुलकी येत असल्याचे दिसत होते, तेव्हा त्यांच्या मागे उभी असलेली एक महिला आपल्या पोटावर हात ठेवत होती. त्यानंतर ट्रम्प यांचे डोळे उघडलेले दिसत होते. वरील घटनेनंतर सोशल मीडिया यूजर्सनी या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध असल्याचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली. त्या ‘मिस्ट्री गर्ल’कडे एक बजर असल्याचा दावा करण्यात आला. नेटकऱ्यांच्या मते त्या महिलेने आपल्या पोटावर एक बटन लावले आहे. ट्रम्प यांना झोप लागल्याचे तिच्या लक्षात आले की, ती हे बटन दाबते आणि त्यामुळे ट्रम्प जागे होतात, असा दावा केला जात आहे. मात्र, अनेकांनी हा केवळ अफवा आणि विनोदाचा भाग असल्याचे म्हटले आहे!