पुढारी ऑनलाईन डेस्क : आनंदी जीवन जगणं म्हणजे नेमके काय ? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच व्यक्तीनिहाय वेगळे असते. त्यामुळेच आनंदी जीवनाची व्याख्या काही शब्दांमध्ये करता येत नाही. मात्र जगभरातील लोकांच्या जीवनात आनंद असावा, त्यांचे कल्याण व्हावे, या ध्येयाने दरवर्षी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने २० मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो. आनंद हा एक मूलभूत मानवी हक्क आहे, याचे स्मरण करून देणार हा दिवस आहे. यानिमित्त आज वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 जाहीर झाला असून, यामध्ये आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पुन्हा एकदा फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. ( International Day of Happiness)
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच भूतान या देशाने आनंद दिन साजरा करण्याची सुरुवात केली. जुलै २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २० मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जावा, असा ठराव मंजूर झाला.
आनंद या भावनेवर झालेल्या अध्ययनात असे आढळून आले आहे की, उदारतेची कृत्ये करणे हे आनंदी भावनेत लक्षणीय योगदान देते. यामुळे या वर्षी आनंद दिनाची संकल्पना ही "काळजी घेणे आणि समावून घेणे" अशी आहे. या माध्यमातून जगभरात दयाळूपणा आणि उदारतेचे महत्त्व अधोरेखित व्हावे हा उद्देश आहे.
आज प्रसिद्ध झालेल्या 'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट'नुसार, २०२५ मध्येही फिनलंड या देशाने सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन यांचा क्रमांक येताे. देशातील दरडोई उत्पन्न, सामाजिक आधार, निरोगी आयुर्मान, स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचार आदी घटकांचा विचार करुन हा क्रम ठरवला जाताे. अहवालात सर्वात आनंदी आणि सर्वात कमी आनंदी देशांमधील तफावत अधोरेखित केली आहे. या यादीत अफगाणिस्तान तळाशी आहे.
अहवालात भारताला १२६ व्या स्थानावर स्थान देण्यात आले आहे. मागील वर्षी म्हणजे २०२४ मध्येही भारत याच स्थानी होते. विशेष म्हणजे, आनंदी देशांच्या यादीत भारत हा नेपाळ आणि पाकिस्तानसारख्या दक्षिण आशियाई शेजारी देशांपेक्षा मागे आहे. हे दाेन्ही देश आनंदी देशांच्या यादीत अनुक्रमे ९३ आणि १०९ व्या स्थानावर आहेत.
गेल्या वर्षी पहिल्यांदाच टॉप २० मधून बाहेर पडल्यानंतर अमेरिका आनंदी देशांच्या यादीत २४ व्या क्रमांकावर आले आहे.
१) फिनलंड, २) डेन्मार्क, ३) आइसलँड, ४) स्वीडन, ५) नेदरलँड्स, ६) कोस्टा रिका, ७) नॉर्वे, ८) इस्रायल, ९) लक्झेंबर्ग, १०) मेक्सिको, ११) ऑस्ट्रेलिया, १२) न्यूझीलंड, १३) स्वित्झर्लंड, १४) बेल्जियम, १५) आयर्लंड, १६) लिथुआनिया, १७) ऑस्ट्रिया, १८) कॅनडा, १९) स्लोव्हेनिया, २०) चेक प्रजासत्ताक
अफगाणिस्तान (क्रमांक १४७) पुन्हा एकदा यादीत शेवटचा आहे. सिएरा लिओन (क्रमांक १४६), लेबनॉन (क्रमांक १४५), मलावी (क्रमांक १४४) आणि झिम्बाब्वे (क्रमांक १४३) आनंदी देशांच्या यादीत तळातील पाच देशांमध्ये आहे.