आंतरराष्ट्रीय

पाकमध्ये मंदिराविरोधात फतवा | पुढारी

Pudhari News

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

पाकिस्तानच्या राजधानीत हिंदूंसाठी भगवान श्रीकृष्णाचे मंदिर उभारण्याचे आश्वासन देणे, मंजुरी देणे आणि नंतर मंदिराचे काम रोखणे, यामुळे या देशाची 'कट्टर इस्लामिक' ही प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. इम्रान खान सरकारने मंदिराला आधी परवानगी दिली, अनुदानही जारी केले; पण कट्टरपंथीयांनी मंदिराविरुद्ध दबाव आणताच मंदिराचे काम थांबविले गेले आहे. दरम्यान, आता तरी धार्मिक कट्टरता सोडा आणि मंदिराचे काम पूर्ण करा, असे 'अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल'ने इम्रान सरकारला ठणकावले आहे. 

गेल्या आठवड्यात मंदिराचे काम सुरू झाले होते. कम्पाऊंड वॉलही बांधली गेली होती आणि इस्लामाबादच्या स्थानिक प्रशासनाने हे काम थांबविले. काही लोकांनी संरक्षक भिंतही रातोरात तोडून टाकली. आता सरकार म्हणते आहे, 'सर्व बाजूंनी विचार करू, सर्वांशी चर्चा करू.' 

'अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल'ने मंगळवारी इस्लामाबादेतील मंदिर उभारणी रोखल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानला सल्लाही दिला. पाकिस्तानच्या घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. धार्मिक स्वातंत्र्य जपणे ही पाकिस्तानची एक आंतरराष्ट्रीय जबाबदारीसुद्धा आहे. मंदिराचे काम रोखणे ही केवळ आणि केवळ कट्टरता आहे.

नेमके काय झाले?

जगभरात आपली प्रतिमा उजळावी म्हणून इम्रान यांनी गेल्या महिन्यात इस्लामाबादेत मंदिराला मंजुरीच नव्हे, तर 10 कोटी रुपयांचे बजेटही जाहीर केले. प्रस्तावित मंदिरासाठी 20 हजार चौरस फूट जमीन देण्यात आली. संरक्षक भिंत आणि पायाचे काम सुरू होताच स्थानिक प्रशासनाने गुरुवारी ते थांबवले. मंदिराचा आराखडा आवश्यक आहे, असे कारण त्यासाठी समोर ठेवले.

पुढे एका रात्रीत काही लोकांनी संरक्षक भिंत तोडून टाकली. इस्लामाबाद उच्च न्यायालयात मंदिराविरुद्ध याचिकाही दाखल झाली. इस्लामी शिक्षण देणार्‍या जामिया अशर्फियाने मंगळवारी स्पष्ट केले की, मंदिराची उभारणी करणे इस्लामच्या विरुद्ध आहे. या संस्थेने मंदिराविरुद्ध फतवाही जारी केला. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT