लंडन/हाँगकाँग: हाँगकाँगहून लंडनला जाणार्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विमानात असलेल्या 331 प्रवाशांना तब्बल 13 तास मृतदेहासोबत प्रवास करावा लागला. त्यामुळे विमानातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण आणि भीतीदायक बनले होते.
ब्रिटीश एअरवेजचे विमान (फ्लाईट 32) हाँगकाँगहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या एका तासात एका 60 वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला.या महिलेच्या निधनामुळे तिचे कुटुंब आणि विमानातील कर्मचारी हादरून गेले. प्रवाशाचा मृत्यू झालेला असल्याने विमान हाँगकाँगला परत नेणे किंवा आपत्कालीन लँडिंग करणे ही इमर्जन्सी मानली गेली नाही. त्यामुळे विमान लंडनच्या दिशेने पुढे नेण्याचा निर्णय झाला. मृतदेह शौचालयात ठेवण्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर, तो कापडात गुंडाळून विमानाच्या मागील भागातील गॅली (स्वयंपाकघर क्षेत्र) मध्ये हलवण्यात आला. दुर्दैवाने, ज्या गॅलीमध्ये मृतदेह ठेवला होता त्या ठिकाणचे वातावरण गरम होते. यामुळे प्रवासाच्या शेवटच्या काही तासांत विमानात तीव्र दुर्गंधी पसरली, ज्याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.