कॅनबेरा; वृत्तसंस्था : 'वोलेमी पाईन' नावाची वनस्पती वीस लाख वर्षांपूर्वी नामशेष झाली, असे मानले जात होते. गिर्यारोहकांच्या एका समूहाला सन १९९४ मध्ये ही वनस्पती पुन्हा आढळली. त्यामुळे डायनासोरच्या काळातील या वनस्पतीला 'जिवंत जीवाश्म' असेही म्हटले जाऊ लागले. ही वनस्पती कशी तग धरून राहिली, याबाबतचे गूढ संशोधकांना होते. आता त्यांनी या वनस्पतीच्या जीनोमला डिकोड केले असून, तिचे याबाबतचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
१९९४ मध्ये गिर्यारोहकांच्या एका समूहाला ऑस्ट्रेलियात सीडनीच्या पश्चिमेस शंभर किलोमीटरवरील बोलेमी नॅशनल पार्कमधील एका दरीत विचित्र अशी झाडे आढळून आली. एका गिर्यारोहकाने ही बाब पार्कच्या एका तज्ज्ञाच्या निदर्शनास आणून दिली व त्यांनी या वनस्पतीचे नमुने एका वनस्पती शास्त्रज्ञाला दिले. त्यावेळी उलगडा झाला की, ही वनस्पती अशा काळातील आहे ज्या काळात पृथ्वीतलावर डायनासोर वावरत होते. त्या काळातच ही वनस्पती प्रजाती लुप्तही झाली होती. १४ कोटी ५० लाख ते ६ कोटी ६० लाख वर्षांपूर्वीच्या 'क्रेटाशियस काळातील ही वनस्पती असून, तिला वोलेमी पाईन किंवा वैज्ञानिक भाषेत 'बोलेमिया नोबिलिस' असे म्हटले जाते.
सध्या जंगलांमध्ये अशी केवळ ६० झाडे अस्तित्वात आहेत. या प्राचीन झाडांना वणव्यांचा धोका आहे. ही वनस्पती प्रजाती २० लाख वर्षांपूर्वीच नामशेष झाल्याचे मानले जात होते. आता ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इटलीतील संशोधकांनी या वनस्पतीच्या जीनोमला डिकोड केले आहे. त्यामुळे या वनस्पतीच्या उत्क्रांती तसेच प्रजननाशी संबंधित गोष्टींवर नवा प्रकाश पडू शकतो. तसेच त्यांचे संवर्धन कशाप्रकारे करता येऊ शकेल, याचीही माहिती मिळू शकेल. या पाईन वृक्षामध्ये २६ गुणसूत्रे (क्रोमोसोम्स) असतात व ज्यामध्ये १२.२ अब्ज
'बेस पेअर्स' म्हणजे मूळ जोड्या असतात. तुलनेने माणसामध्ये केवळ ३ अब्ज बेस पेअर्स' असतात, हे विशेष! जीनोमचा आकार मोठा असला, तरी बोलेमी पाईन वनस्पती ही जनुकीय वैविध्यामध्ये अतिशय कमीच असते. त्यामधूनच या वनस्पतीची संख्या एकेकाळी अतिशय रोडावली होती है स्पष्ट होते, असे नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या प्लॅट जीनोम रिसर्च प्रोग्रामचे संचालक गेरार्ड श्चोननेच यांनी सांगितले.