जीनिव्हा : मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने (डब्ल्यूएमओ) वर्तवला आहे. वाढत्या ‘अल निनो’चा हा संकेत असून त्याचा परिणाम जगभरातील तापमान, पाऊस, अर्थव्यवस्था आणि मानवी जीवनावर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, यंदा कडक हिवाळा जाणवण्याची शक्यता फारच कमी असून हिवाळ्याचे दिवसही २५ दिवसांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
‘डब्ल्यूएमओ’च्या अंदाजानुसार, ‘अल निनो’चा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहण्याची जवळजवळ १०० टक्के शक्यता आहे. हा १९५० नंतरचा सर्वाधिक शक्तिशाली ‘अल निनो’ ठरू शकतो. पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील तफावत जूनमध्ये १.६ अंश सेल्सिअस तर ऑगस्टमध्ये २.५ अंश सेल्सिअस होती. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ती ३.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
या बदलामुळे जगातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. काही प्रदेशांत अतिवृष्टी व पूर तर काही भागांत दुष्काळाचा धोका वाढू शकतो. भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकारात्मक इंडियन ओशन डायपोलातही (हिंदी महासागरातील समुद्र पृष्ठभागाच्या तापमानातील पूर्व-पश्चिम तफावत व त्यासोबत होणारा नैसर्गिक हवामान बदल) पावसाच्या नमुन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘डब्ल्यूएमओ’ने विविध देशांच्या हवामान संस्थांच्या सहकार्याने संभाव्य परिणामांचा आढावा घेतला असून आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्वतयारीसाठी संबंधित यंत्रणांना नियमित माहिती दिली जात आहे.
अधिक : आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेच्या पूर्वेकडील पॅसिफिकमध्ये.
कमी : भारतीय उपखंड, दक्षिण मध्य अमेरिका, कॅरेबियन बेटे, दक्षिण अमेरिका.
दुष्काळ : पश्चिम पॅसिफिक, अटलांटिक, दक्षिण पॅसिफिक, दक्षिण अमेरिका.
‘डब्ल्यूएमओ’ व तिच्या सदस्यांनी अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांवर ‘अल निनो’चा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सोबतच, राष्ट्रीय हवामानशास्त्र व हायड्रोलॉजिकल सेवा, प्रादेशिक मंच व संयुक्त राष्ट्र यंत्रणेला सातत्याने अपडेटस् दिले जात आहेत.
यंदा थंडीचा कालावधी १५ ते २५ दिवसांनी कमी होऊ शकतो. हिवाळ्याचा प्रत्यक्ष प्रभाव नोव्हेंबरच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच मर्यादित राहू शकतो. नोव्हेंबर नेहमीपेक्षा जास्त उबदार राहील. हिवाळ्यांत थंड लहरी कमी येतील. मध्येच उकाडा किंवा तापमानवाढ अनुभवण्यास मिळेल. पावसातील तुटीमुळे हवामान कोरडे राहील, ज्यामुळे दिवसा कडक ऊन व उष्णता राहील. केवळ रात्री थोडा गारवा असेल. एकंदरीत, यंदा कडक हिवाळा राहणार नाही. बदलत्या हवामानाचा गव्हासारख्या रब्बी पिकांवरही परिणाम होण्याची चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘अल निनो’ आणि वाढती उष्णता हा ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान बँकॉक, थायलंड येथे होणार्या ‘ग्लोबल हीट फोरम’च्या प्रमुख विषयांपैकी एक आहे. ‘डब्ल्यूएमओ’ या कार्यक्रमाच्या प्रायोजकांपैकी एक असून यात ६०० तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.