US Attack Iran | अमेरिका ४ नोव्हेंबरला इराणवर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता? 
आंतरराष्ट्रीय

US Attack Iran | अमेरिका ४ नोव्हेंबरला इराणवर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता?

काही ठिकाणे उद्‌ध्वस्त करणे बाकी असल्याचे ट्रम्प यांचे वक्तव्य

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन/तेल अवीव; वृत्तसंस्था : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने याबाबत वृत्त दिले असून या चर्चेनंतर रविवारी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित एक-दोन ठिकाणे अद्याप उद्ध्वस्त करायची बाकी असल्याचे विधान केले. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल इराणवर पुन्हा लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेने आखाती देशांना इराणवरील संभाव्य नव्या हल्ल्यांसाठी सज्ज राहण्यास सांगितल्याची माहिती आहे. हे हल्ले ४ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई होऊ शकते.

मध्यावधी निवडणुकीमुळे हल्ला लांबणीवर?

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका होणार आहेत. ट्रम्प सध्या प्रचारात व्यस्त आहेत. इराणबरोबरचे युद्ध आणि इंधनाच्या किमती हे रिपब्लिकन पक्षासाठी चिंतेचे विषय बनले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पक्षाचा पाठिंबा वाढवण्यावर ट्रम्प यांचा भर आहे. याचमुळे इराणवरील कारवाई पुढे ढकलल्याचा अंदाज आहे.

रुबियो म्हणतात, चर्चेला प्राधान्य

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो म्हणाले, ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. ट्रम्प यांना चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचा आहे. मात्र, गरज पडल्यास अमेरिका लष्करी कारवाईही करू शकते.

इराणच्या अमेरिकेकडे तीन मागण्या

अमेरिकेबरोबरच्या चर्चेत इराणने तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. इराणला पूर्वीप्रमाणे तेलविक्रीची मुभा मिळावी. इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध हटवावेत, जेणेकरून देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलासा मिळेल. कतारमध्ये रोखून ठेवलेली सुमारे सहा अब्ज डॉलरची रक्कम इराणला परत मिळावी.

अमेरिका, इस्रायलची लष्करी तयारी

गेल्या काही आठवड्यांत अमेरिकेने पश्चिम आशियात हवाई संरक्षण यंत्रणा, दारूगोळा आणि लष्करी उपकरणांची तैनात वाढवली आहे. इराणकडून हल्ला होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर सैनिक आणि लष्करी सामग्री अन्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासही सुरुवात झाली आहे. अमेरिकी सेंट्रल कमांड आणि इस्रायलने संभाव्य हल्ल्याची तयारी केली आहे. इस्रायलच्या ‘कान’ वृत्तवाहिनीनुसार, गेल्या आठवड्यात अमेरिकेची १० लष्करी मालवाहू विमाने इस्रायलमध्ये दाखल झाली. हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपकरणे या विमानांतून आणल्याचे सांगितले जाते. या उपकरणांचा वापर अमेरिकी आणि मित्रदेशांच्या लष्करी तळांच्या सुरक्षेसाठी होणार आहे.

इराणचा प्रत्युत्तराचा इशारा

इराणनेही अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी लष्करी कमांडरना कोणत्याही नव्या हल्ल्याला तातडीने आणि कठोर प्रत्युत्तर देण्यास सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. प्रत्युत्तराच्या कारवाईला भौगोलिक मर्यादा राहणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. इराणचे लष्करप्रमुख जनरल अली अब्दोल्ला यांनीही संभाव्य लक्ष्यांची यादी वाढवल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT