आंतरराष्ट्रीय

US Politics | रुबियो सोडणार ट्रम्प यांची साथ? व्हान्स यांनीही अंतर राखले

मध्यावधी निवडणुकीत पराभवानंतर रिपब्लिकन पक्षात मतभेद उघड

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आता पक्षांतर्गत राजकारणात उमटू लागले असून, ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांमध्येही मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हे ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हेही ट्रम्प यांच्यापासून राजकीय अंतर राखत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षात नेतृत्व आणि भविष्यातील राजकीय दिशेबाबत नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, मार्को रुबियो आणि त्यांचे सल्लागार भविष्यातील राजकीय पर्यायांवर चर्चा करत आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमधील काही अधिकाऱ्यांशी पद सोडण्याबाबत चर्चा केल्याचेही वृत्त आहे. मात्र, रुबियो यांनी या बातम्यांचा इन्कार केला आहे. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांच्यासोबत काम करणे हीच आपली योजना असल्याचे त्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे २०२८ मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय तयारी करत असल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे नाराज झालेल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे वृत्त आहे. विशेषतः इराणमधील युद्ध, वाढती महागाई आणि इस्रायलला अमेरिकेने दिलेले समर्थन या मुद्द्यांवर नाराज असलेल्या मतदारांशी संपर्क वाढविण्यावर त्यांचा भर असल्याचे सांगितले जाते. इराणमधील संघर्ष हा रिपब्लिकन पक्षाच्या पराभवामागील महत्त्वाचा घटक असल्याचे व्हान्स यांनी मानल्याची चर्चा आहे. मात्र, ट्रम्प यांनी आपल्या निर्णयांचे समर्थन कायम ठेवले आहे.

मस्क यांच्या कंत्राटांची चौकशी?

डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयामुळे उद्योगपती एलॉन मस्क यांच्या सरकारी व्यवहारांची आणि कंपन्यांना मिळालेल्या कंत्राटांची संसदीय चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या हरमीत कौर ढिल्लों यांनी न्याय विभागातील नागरी हक्क विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

९ नोव्हेंबरला अमावास्येनिमित्त इराणवर हल्ला?

वॉशिंग्टन : इराणविरोधातील लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाईसाठी तयारी सुरू केली आहे. इराणचा अणुकार्यक्रम कायमचा नष्ट करण्यासाठी आणखी हल्ले करावेत का, याबाबत ट्रम्प यांनी चर्चा केली. शक्य असल्यास इराणचे उर्वरित नुकसान टाळण्याची इच्छा असल्याचे सांगतानाच, गरज पडल्यास कठोर कारवाई करावी लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. ९ नोव्हेंबरला मध्यपूर्वेत अमावास्येमुळे चंद्रप्रकाश कमी राहणार असल्याने लष्करी कारवाईसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे वृत्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT