दमास्कस : वृत्तसंस्था; अलेप्पो आणि होमपाठोपाठ दारा शहराचा ताबा हयात तहरीर अल श्यामच्या बंडखोरांनी (Syria Civil War) शनिवारी मिळविला होता. सीरियाची राजधानी दमास्कस इथून ९० कि. मी. वर.... दारा हे दमास्कसचे दारच... बघता, बघता तहरीरने रविवारी सकाळी हे दार लोटले आणि दमास्कसमध्ये प्रवेश केला. दमास्कचा ताबा मिळवला. तत्पूर्वीच राष्ट्राध्यक्ष असद (Syria President Bashar al-Assad) देश सोडून पळालेही होते. कुणी म्हणतंय, ते रशियाला गेले. कुणी म्हणतंय, ते इराणला गेले, पण दमास्कसमध्ये रविवारी खूप शोधूनही बशर अल असद हे बंडखोरांच्या हाती लागले नाहीत. म्हणून मग, असद यांच्या दिसेल त्या छायाचित्रावर बंडखोरांनी आपल्या बंदुका रिकाम्या केल्या...
अकरा दिवस चाललेले युद्ध अखेर संपुष्टात
बंडखोरांकडे सत्ता सोपवणार : पंतप्रधान
चोपन्न वर्षांची अल असद राजवट संपुष्टात
अल असद कुटुंब गेली ५४ वर्षे सातत्याने सीरियात सत्तेत होते. ५४ वर्षांची ही अव्याहत राजवट रविवारी संपुष्टात आली. अकरा दिवसांपासून सुरू असलेले युद्धही रविवारीच संपुष्टात आले.
तहरीर ही ओसामा बिन लादेन याच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेचीच एक शाखा आहे. तहरीरचा म्होरक्या अबू मोहम्मद अल जोलानी (Abu Mohammed al-Jolani) याच्यावर १० दशलक्ष डॉलरचे बक्षीस अमेरिकेने जाहीर केलेले आहे. अबू याचा जन्म सौदी अरेबियातील रियाधमध्ये १९८० मध्ये झाला. तिथेच त्याचे बालपण गेले. अबूचे वडील पेट्रोलियम अभियंता होते. अबू याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता, पण अल कायदाच्या संपर्कात आल्याने त्याची दिशाच बदलली. अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यातही अबूची भूमिका होती. पुढे अबूने तहरीरची कमान सांभाळली.
बशर अल असद यांचे समर्थक ठरवून बंडखोर आपले हाल करतील, अशी भीती असलेल्या हजारो लोकांनी विमानतळाकडे धाव घेतली. बंडखोरांनी सीरियन लष्कराचे अधिकारी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून, ते बशर अल असद यांच्या ठावठिकाण्याबाबत चौकशी करत आहेत.
१९७१ मध्ये बशरचे वडील हाफेज अल असद सीरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. पुढे २९ वर्षे ते देशाचे राष्ट्राध्यक्ष राहिले. २००० मध्ये हाफिजच्या मृत्यूनंतर बशर अल असद यांनी सीरियाची सत्ता हाती घेतली. तेव्हापासून ते सीरियाचे राष्ट्राध्यक्ष होते. २०११ मध्ये सीरियात असद यांच्या विरोधात बंड पुकारले गेले. असद यांनी हे बंड क्रूरपणे चिरडून काढले, तेव्हापासून या देशात सतत गृहयुद्ध वा गृहयुद्धसदृश स्थिती कायम राहिली. २०२४ मध्ये असद कुटुंचाची सत्ता संपुष्टात आली आणि सीरिया तहरीरच्या ताब्यात गेला.
असद पळाल्याचे कळताच लोक राष्ट्राध्यक्ष भवनात घुसले. हाती लागेल ती मौल्यवान वस्तू जो तो उचलून नेत होता. दुपारपर्यंत भवन रिकामे झालेले होते. याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.
हयात तहरीर अल श्याम ही संघटना केवळ सीरियातील असद सरकारच्या विरोधात होती, असे नाही. इस्रायल आणि ज्यू धर्मिय लोकांनाही (यहुदी) ही संघटना शत्रू मानते. सीरिया आणि इस्रायलदरम्यानच्या बफर शोनमध्येही काही काळ बंडखोरांनी जल्लोष केला. यावरून त्यांचे आगामी हेतू काय असतील, त्याचे संकेत मिळतात.
सीरियातील लोक ज्याची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करतील, त्याच्यासोबत मी काम करेन.मोहम्मद गाझी अल जलाली, पंतप्रधान, सीरिया
अंधकाराचे असद यूग सीरियातून आता संपुष्टात आलेले आहे. आम्ही देशात नये युग सुरू करु.अबू मोहम्मद अल जोलानी, नेता हयात तहरीर अल श्याम