पीएम मोदी यांनी आज बुधवारी ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया यांच्याशी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी द्विपक्षीय चर्चा केली.  (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

द्विपक्षीय चर्चा अन् केशर पेढा! पीएम मोदी- ब्रुनेई सुलतान यांच्या भेटीत काय घडलं?

PM Modi Brunei Visit | पीएम मोदी यांची सुलतान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई देशाच्या दौऱ्यावर (PM Modi Brunei Visit) आहेत. भारत आणि ब्रुनेई यांच्यात अधिकृतपणे राजनैतिक संबंधांना ४० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पीएम मोदी हे ब्रुनेईचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ते मंगळवारी ब्रुनेई येथे दाखल झाले होते. तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

ब्रुनेई सुलतान यांच्या निवासस्थानी पीएम मोदींसाठी खास मेन्यू

दरम्यान, संपूर्ण जगात गर्भश्रीमंत असलेले ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया यांचे अधिकृत निवासस्थान इस्ताना नुरुल इमान पॅलेसमध्ये पीएम मोदींसाठी खास मेन्यू ठेवण्यात आला आहे. यात आंब्याचा केशर पेढा आणि मोतीचूर लाडू या पदार्थांचा समावेश आहे. ब्रुनेईमधील भारतीय दूतावासाने दुपारच्या जेवणाच्या मेन्याचा फोटो X वर शेअर केला आहे. या मेन्यूमध्ये चना मसाला, कोफ्ता, भेंडी आणि जीरा राइस किंवा ग्रील्ड लॉबस्टर, तस्मानियन सॅल्मन, प्रॉन्स स्कॅलॉप्स आणि कोकोनट बार्ली रिसोट्टो हे पदार्थही ठेवण्यात आले आहेत. यासोबतच राइस केक, मसूर सूप, व्हेजिटेबल क्विच आणि फॉरेस्ट मशरूम विथ ब्लॅक ट्रफल देखील आहे. आंब्याचा केशर पेडा, मोतीचूर लाडू आणि सुरती घारी पिस्ता हे मिठाई पदार्थही मेन्यूमध्ये आहेत.

पीएम मोदी यांची सुलतान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

पीएम मोदी यांनी आज बुधवारी सुलतान हसनल बोल्किया (Sultan Haji Hassanal Bolkiah) यांच्याशी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी द्विपक्षीय चर्चा केली. “या बैठकीदरम्यान आम्ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांसह सविस्तर चर्चा केली. व्यापार आणि व्यावसायिक संबंध आणि लोकांमधील संवाददेखील वाढविली जाईल,” असे पीएम मोदी यांनी X ‍‍वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारत- ब्रुनेई द्विपक्षीय संबंध मजबूत- पीएम मोदी

ब्रुनेई दारुस्सलाम येथे बोलताना पीएम मोदी म्हणाले, "तुमच्या प्रेमळ शब्दांबद्दल, भव्य स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी तुमचे आणि संपूर्ण राजघराण्याचे मनापासून आभारी आहे. ब्रुनेईला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. ब्रुनेई यावर्षी स्वातंत्र्याची ४० वर्षे पूर्ण करेल. १४० कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हाला आणि ब्रुनेईच्या जनतेला शुभेच्छा देतो. भारत आणि ब्रुनेई यांच्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत आहेत. या वर्षी आम्ही द्विपक्षीय राजकीय संबंधांचा ४० वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आम्ही आर्थिक, वैज्ञानिक आणि धोरणात्मक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत."

कसा आहे इस्ताना नुरुल इमान पॅलेस?

ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान (Bandar Seri Begawan) येथे असलेला इस्ताना नुरुल इमान (Istana Nurul Iman) पॅलेस हा जगातील सर्वात भव्य पॅलेस असल्याचे म्हटले जाते. तो भव्य असून त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या पॅलेसमध्ये १,७८८ खोल्या, २५७ स्नानगृहे आणि ३८ विविध प्रकारच्या संगमरवरीपासून बनवलेल्या ४४ पायऱ्या आहेत. १९८४ साली ब्रुनेईला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. या पॅलेसची किंमत २,२५० कोटी रुपये आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT