imran khan | bushra bibi | asim munir Pudhari
आंतरराष्ट्रीय

Imran Khan on Asim Munir | माझ्या पत्नीबाबत जे झालं, ते पूर्वी कधीच घडलं नाही; इम्रान खान यांचा लष्करप्रमुख मुनीर यांच्यावर आरोप

Imran Khan on Asim Munir | असीम मुनीर यांना ISI प्रमुखपदावरून हटवल्यानंतर ते माझ्या पत्नीशी बोलू लागले...

Akshay Nirmale

Imran Khan on Asim Munir

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

“माझी पत्नी बुशरा बीबी हिला सूडभावनेतून अटक करण्यात आली आणि तिच्यावर अमानुष वागणूक केली जात आहे,” असे वक्तव्य इम्रान खान यांनी सोमवारी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत केलं.

पत्नीवर सूडबुद्धीने कारवाई – इम्रान खान यांचा दावा

इम्रान खान यांनी म्हटलं आहे की, "जेव्हा मी पंतप्रधान होतो, तेव्हा मी जनरल असीम मुनीर यांना ISI प्रमुखपदावरून हटवलं. त्यानंतर त्यांनी माझ्या पत्नीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण बुशरा बीबीने स्पष्ट नकार दिला की त्या कोणत्याही प्रकारच्या राजकीय किंवा लष्करी चर्चेत सहभागी होणार नाहीत. त्यानंतर असीम मुनीर यांनी सूड घेण्यास सुरुवात केली."

“बुशरा बीबी ही सामान्य गृहिणी आहे, तिचा कोणताही राजकीय सहभाग नाही. तरीही तिच्यावर खोटे आरोप लावून, न्यायालयीन प्रक्रिया न पाळता तिला 14 महिन्यांपासून तुरुंगात ठेवण्यात आलं आहे,” असंही ते म्हणाले.

मे ९ च्या घटनांमागे 'लंडन प्लॅन'”

इम्रान खान यांनी पुन्हा एकदा 9 मे 2023 रोजी झालेल्या लष्करी ठिकाणांवरील हल्ल्याचा उल्लेख करत तो 'लंडन प्लॅन'चा भाग असल्याचं म्हटलं आहे. "या योजनेअंतर्गत आमच्यावर खोटे आरोप लावून तुरुंगात टाकण्यात आलं, आमचा जनादेश चोरला गेला आणि भ्रष्ट नेत्यांना सत्तेवर बसवण्यात आलं,” असा आरोप त्यांनी केला.

‘लंडन प्लॅन’ काय आहे?

इम्रान खान यांच्या मते, ही एक गुप्त योजना होती, जी लंडनमध्ये पाकिस्तानातील सत्ताधारी व लष्करी अधिकारी आणि परदेशी गुप्तचर यंत्रणा यांच्यात तयार झाली. इम्रान खान आणि त्यांच्या पीटीआय पक्षाला पूर्णपणे राजकारणातून बाहेर फेकणे हा या प्लॅनचा उद्देश होता.

न्यायव्यवस्था लाजिरवाणी स्थितीत

इम्रान खान यांनी पाकिस्तानातील न्यायालयांवरही कठोर टीका केली. "कोणताही न्यायाधीश मे 9 च्या घटना स्थळावरील CCTV फुटेज मागवत नाही, निकाल पुराव्यावर आधारित नसून राजकीय दबावाखाली दिले जात आहेत. आम्हाला निष्पाप असूनही शिक्षा दिल्या जात आहेत,” असेही ते म्हणाले.

त्यांनी न्यायालयांकडे मागणी केली की, 9 मे 2023 आणि 26 नोव्हेंबर 2024 रोजी इस्लामाबादमध्ये जे निष्पाप लोक मारले गेले, त्या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी एक न्यायिक आयोग स्थापन केला जावा.

न्यायाधीश स्वतःचे पद व प्रतिष्ठा वाचवण्यात व्यग्र

"ज्याप्रमाणे भूतकाळात न्यायमूर्ती मुनीर यांनी चुकीचे निर्णय दिले, त्याच पावलांवर आज न्यायमूर्ती काझी फयाज ईसा चालत आहेत. संपूर्ण न्यायव्यवस्था ही अन्यायाला खतपाणी घालणारी ठरली आहे," अशी टीका इम्रान खान यांनी केली.

दरम्यान, ही वक्तव्ये अशा काळात आली आहेत जेव्हा पीटीआयच्या अनेक समर्थकांवर खटले चालू आहेत आणि काहींना शिक्षा देखील झाली आहे. मागील आठवड्यात, 11 पीटीआय समर्थकांना 9 मेच्या हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली. सध्या इम्रान खान रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात आहेत.

कोण आहे बुशरा बीबी?

बुशरा बीबी या इम्रान खान यांच्या तिसऱ्या पत्नी असून त्या आध्यात्मिक पंथाच्या अनुयायी आहेत. त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. त्यांच्यावर भ्रष्टाचार व अंमलबजावणी प्रक्रियेत अडथळा आणल्याचे आरोप लावून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे.

इम्रान खान यांनी म्हटले आहे की, कोणताही ठोस पुरावा नसताना बुशरा बीबी यांना एकापाठोपाठ एक खटल्यांत गुंतवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT