पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धात तोडगा काढण्याबाबत बोलण्यास तयार आहे. दोन्ही देशातील संभाव्य शांतता चर्चेत भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थी करू शकतात, असे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे.
रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEZ) मधील चर्चेदरम्यान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) म्हणाले की, २०२२ मध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा तुर्कीने दोन्ही देशांदरम्यान करार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या अटींची कधीच अंमलबजावणी झाली नाही. आता पूर्वीचे प्रयत्न नव्याने चर्चा सुरू करण्यासाठी आधार म्हणून वापरले जाऊ शकतात. आमचा मुख्य उद्देश युक्रेनचा डोनबास प्रदेश ताब्यात घेणे आहे. रशियन सैन्य हळूहळू कुर्स्कमधून युक्रेनियन सैन्याला मागे हटवत आहेत, असे पुतिन यांनी सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, याआधी व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध थांबवण्यासाठी दोन अटी ठेवल्या होत्या. युक्रेनला डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझिया येथून आपले सैन्य मागे घ्यावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते. याशिवाय युक्रेन कधीही नाटोचा भाग होणार नाही. मात्र, युक्रेनने या अटी मान्य करण्यास नकार दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच युद्धग्रस्त युक्रेन आणि त्याआधी रशियाला भेट दिली होती. मोदींच्या या दोन्ही भेटी अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि जागतिक पातळीवर चर्चेचा विषय होत्या. पंतप्रधान मोदी जुलै महिन्यात रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेत त्यावेळी शांततेचा मार्ग युद्धभूमीतून येत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यादरम्यान पुतिन यांनी मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल देऊन सन्मानित केले होते. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की त्यांच्या भेटीमुळे संतप्त झाले आणि त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
रशियानंतर मोदींनी २३ ऑगस्टला युक्रेनला भेट दिली. पोलंडहून ट्रेनने ते कीवला पोहोचले. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या भेटीनंतर मोदींनी युक्रेनने वेळ न घालवता शांततेबद्दल बोलले पाहिजे. संवादातूनच तोडगा निघतो, असे म्हटले होते. तसेच मोदींनी त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचे आश्वासनही दिले होते.