पुढारी ऑनलाईन डेस्क: एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबायचे नाव घेत नसताना दुसरीकडे रशियातील एका 19 वर्षाच्या मुलीला तुरूंगात टाकण्यात आल्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका होत आहे. दरिया कोझिरेवा असे या मुलीचे नाव आहे.
आधी या मुलीला घरातच नजरकैद केले गेले. नंतर तिला डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवले गेले आणि आता थेट तिची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. केवळ एक कविता लिहिल्याने तिला तुरूंगात टाकण्यात आले आहे. रॉयटर या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दरिया कोझिरेवा ही रशियन सैन्याला सतत सार्वजनिकपणे बदनाम करत होती. काही दिवसांपूर्वी तिने एका चौकातील पुतळ्यावर एक पोस्टर लावले होते, ज्यावर 19व्या शतकातील एका क्रांतिकारकाच्या ओळी लिहिल्या होत्या आणि हेच तिच्या अडचणीचे कारण ठरले.
पार्कमध्ये काय लिहिलं होतं?
अलीकडे तिने सेंट पीटर्सबर्गमधील एका पार्कमध्ये तारास शेवचेंको यांच्या कवितेच्या ओळी एका कागदावर लिहून चिटकवल्या होत्या: त्या ओळी अशा,
“Oh bury me, then rise ye up,
And break your heavy chains,
And water with the tyrant’s blood,
The freedom you have gained.”
याचा अर्थ असा — "माझा मृतदेह पुरलात, तरी उठून उभे राहा, अन्यायाच्या साखळ्या तोडा आणि स्वातंत्र्याची जपणूक करा."
या ओळी लावल्यानंतर लगेचच दरियाला अटक करण्यात आली आणि कोर्टाने तिला शिक्षा सुनावली आहे.
याआधीही तिने सातत्याने रशियन सैन्य आणि सरकारविरोधात लिखाण केले होते. त्यामुळे तिला हाऊस अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते. नंतर डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. तरीदेखील ती सरकारविरोधात भूमिका घेणे थांबवत नव्हती.
त्यामुळे तिला अनेक वेळा दंडही ठोठावण्यात आला. अखेरीस, पुतिन यांच्या सैन्याविरोधात उघडपणे बोलणाऱ्या या मुलीला आता तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पार्कमध्ये लावलेल्या क्रांतिकारी कवितेमुळे तिला 2 वर्षे आणि 8 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शिक्षा सुनावण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. दरिया कोझिरेवा ही युद्धविरोधी भूमिका घेतल्यामुळे तुरुंगात गेलेल्या 243 लोकांपैकी एक आहे. हे पहिल्यांदाच घडले नाही – याआधीही ती अशा प्रकारचे आंदोलन करत होती.
2022 मधील प्रकार
सन 2022 मध्ये तिने एका दगडावर लिहिलेल्या कलाकृतीवर काळ्या रंगाने लिहिले होते – "Murderers, you bombed it. Judases". म्हणजे, “तुम्ही खुनी आहात. तुम्ही बॉम्ब टाकलात.” इथे ‘जूडासेस’ हे बायबलमधील ज्युड्स वरून घेतेले आहे ज्याने येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला होता.
तिने जेव्हा पहिल्यांदा पुतिन यांच्या सैन्याविरोधात आवाज उठवला, तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती. ती सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. 2024 मध्ये तिच्यावर 370 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आणि नंतर विद्यापीठातून काढून टाकण्यात आले.