रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन दोनदिवसीय भारत दौर्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्या दौर्यावर रशिया-युक्रेन युद्ध आणि शांतता करारासाठी अमेरिकेचा दबाव यासारख्या भू-राजकीय गुंतागुंतीचे सावट असले, तरी त्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेभोवतीचे रहस्य हा एक महत्त्वाचा पैलू आहे. अनेक असामान्य गोष्टींपैकी, पुतीन जिथे जातात तिथे ‘बॉडी डबल’ घेऊन जातात, अशी चर्चा आहे.
अलास्का भेटीचे रहस्य
यावर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांची अलास्कामध्ये भेट झाली होती; पण पुतीन रशियातून बाहेर पडलेच नव्हते, ट्रम्प यांना भेटणारा त्यांचा ‘बॉडी डबल’ होता, अशी अफवा पसरली होती. विमानातून उतरलेल्या व्यक्तीची गालाची हाडे अधिक भरलेली होती आणि तो स्वतः पुतीनपेक्षा अधिक आनंदी दिसत होता, अशी चर्चा होती.
डमी पुतीन प्रकरण काय आहे?
याला कोणतीही अधिकृत पुष्टी नाही आणि ‘क्रेमलिन’ने सर्व दावे स्पष्टपणे नाकारले आहेत. तथापि, अनेक अहवालांमध्ये दावा केला आहे की, पुतीन मोठ्या सार्वजनिक सभांना उपस्थित राहताना किंवा जास्त धोक्याच्या ठिकाणी जाताना ‘बॉडी डबल’चा वापर करतात.
तीन बॉडी डबल्सचा वापर
युक्रेनचे लष्करप्रमुख मेजर जनरल किरिलो बुदानोव्ह यांनी दावा केला आहे की, रशियन राष्ट्राध्यक्ष किमान अशा तीन डबल्सचा वापर करतात, ज्यापैकी काहींनी त्यांच्यासारखे अधिक प्रभावीपणे दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे.
डीपफेकवर पुतीन
2023 मध्ये, पुतीन यांनी ‘बॉडी डबल’ वापरल्याचा इन्कार केला आणि त्यांच्या डीपफेक आवृत्तीला पहिला जुळा म्हटले. ‘तुम्ही माझ्यासारखे बोलू शकता आणि माझा आवाज, माझा सूर वापरू शकता; पण मला वाटले की, फक्त एकच व्यक्ती माझ्यासारखी बोलू शकते आणि माझा आवाज वापरू शकते आणि ती व्यक्ती मी असेन,’ असे पुतीन म्हणाले.
150 वर्षांचे आयुष्य!
यापूर्वी सप्टेंबरमध्ये, पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमरत्व आणि मानवाच्या 150 वर्षे जगण्याच्या शक्यतेवर चर्चा करताना हॉट माईकवर पकडले गेले होते. ‘क्रेमलिन’ने पुतीन आणि जिनपिंग यांच्यात या प्रकारची चर्चा झाली नसल्याचे नमूद केले होते.