पुढारी ऑनलाईन डेस्क : Maternity Photoshoot Trend | सध्या सोशल मीडियावर एक विचित्र ट्रेंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तरुण, अविवाहित मुली गर्भवती नसतानाही बनावट मॅटर्निटी फोटोशूट करत आहेत. या ट्रेंडला 'प्री-सेट फोटोशूट' असे म्हटले जात आहे. जीवनातील काही खास क्षण उत्तम प्रकारे टिपणे असा त्याचा उद्देश असून सध्या चीनमध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.
चिनी संस्कृतीत लग्नाशिवाय आई बनणे समाज आणि संस्कृतीच्या विरोधात मानले जाते. त्यामुळे काही लोक या ट्रेंडवर आक्षेप घेत आहेत. पण दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की हा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. हुनान प्रांतातील इन्फ्लुएंसर मीजी गिगीने बनावट बेबी बंप असलेला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर 'प्रीमेड मॅटर्निटी फोटोशूट' ट्रेंड सुरू झाला. यामागचे कारण मीजी सांगतात, 'जोपर्यंत मी तरुण आहे आणि माझी फिगर स्लिम आहे, तोपर्यंत मला आयुष्याचा प्रत्येक क्षण जगायचा आहे. त्यामुळेच मी हे फोटोशूट केले आहे. १३ ऑक्टोबर रोजी तिने तिच्या स्लिम लूकसह मॅटर्निटी फोटोशूटमधील फोटो शेअर केले.
एका अहवालानुसार, चीनमध्ये विवाह आणि जन्मदर सातत्याने कमी होत आहेत, त्यामुळे हा ट्रेंड आणखीनच चर्चेत आहे. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयानुसार २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांत केवळ ४.७५ दशलक्ष विवाहांची नोंद झाली.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, २६ वर्षीय चिनी महिलेने या ट्रेंडबद्दल सांगितले की, तिला आई बनण्याची अनुभूती घ्यायची आहे. त्याचा तिच्या फिगरवर परिणाम होत नाही म्हणून तिने हे केले. आणखी एक चिनी महिला सांगते की, 'या ट्रेंडमुळे २२ व्या वर्षी असे फोटो काढता आले. कारण वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत सुरकुत्या दिसू लागतील आणि फोटो सुंदर येणार नाहीत.
चीनच्या ऑनलाइन मार्केटमध्ये अनेक प्रकारचे बनावट बेबी बंप उपलब्ध आहेत, जे तीन महिने, सहा महिने आणि आठ महिन्यांच्या गर्भधारणे प्रमाणे दिसतात. गरोदरपणासारखे शरीरात कोणतेही बदल न होता मुली या मदतीने त्यांचे मॅटर्निटी फोटो पोस्ट करत आहेत.