इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातही हिंसाचार, राजकीय संघर्ष आणि मतदानातील गैरप्रकारांच्या आरोपांची मालिका सुरूच राहिली. सोमवारी चार मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले; मात्र कायदा-सुव्यवस्थेच्या चिंतेमुळे सात मतदारसंघांतील मतदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले.
पहिल्या दोन टप्प्यांचे मतदान २७ जुलै आणि २ ऑगस्ट रोजी झाले होते. या दोन्ही टप्प्यांमध्येही हिंसक संघर्षाचे आरोप झाले होते. तिसऱ्या टप्प्यात काही भागांत पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचे वृत्त आहे.
चार मतदारसंघांमध्ये मतदानासाठी एकूण ८०३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. यापैकी बहुतांश केंद्रांना निवडणूक आयोगाने ‘संवेदनशील’ किंवा ‘अतिसंवेदनशील’ म्हणून वर्गीकृत केले होते. दरम्यान, पूंछ विभागातील सात जागांवरील मतदान कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे अंतिम टप्प्यातही सर्व ४५ जागांवर मतदान पूर्ण होऊ शकले नाही.
तिसऱ्या टप्प्यात मुस्लिम लीगने मतदानात मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचा आरोप पीपीपीने केला आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, बन्नी मरासिरा भागाकडे जाणारे रस्ते अडवले होते. यामुळे अधिकारी, मतदार, मतदान प्रतिनिधी आणि पक्षाचे कार्यकर्ते मतदान केंद्रांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. काही मतदान केंद्रांमधून त्यांच्या मतदान प्रतिनिधींना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मुस्लिम लीग समर्थकांनी मतपत्रिकांवर शिक्के मारले. सेंट्रल बागमधील एका शाळेतील मतदान केंद्रावर मुस्लिम लीग कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा व्हिडीओही पक्षाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. या आरोपांना दुजोरा मिळालेला नाही.
पीओकेमध्ये जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी या नागरी समाजातील विविध संघटनांच्या आघाडीच्या नेतृत्वाखाली जूनच्या सुरुवातीपासून आंदोलन सुरू आहे. प्रादेशिक सरकारने जूनमध्ये या संघटनेवर बंदी घातली होती. जेएएसीकडून पीओके विधानसभेतील १२ निर्वासित जागा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. या जागांचा वापर राजकीय हस्तक्षेपाद्वारे आपल्या पसंतीचा पंतप्रधान निवडण्यासाठी केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सुमारे ४०० आंदोलक ठार झाल्याचा तसेच २७ जुलै रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यानच ४० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा जेएएसीने केला आहे.
या निवडणुकीत पीएमएल-एनला सत्तास्थापनेच्या दृष्टीने आघाडी मिळाली आहे. पहिल्या दोन टप्प्यांत झालेल्या ३४ जागांच्या मतदानात पीएमएल-एनने २४ जागा, तर केंद्रातील त्यांचा आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या पीपीपीने १० जागा जिंकल्या.
पीओके विधानसभेत एकूण ४५ जागा आहेत. पीएमएल-एन सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. नवाज शरीफ हे पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवणार आहेत.