वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी आपल्या हिंदू पत्नी उषा वान्स यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा, अशी इच्छा व्यक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी येथील टर्निंग पॉईंट यूएसए कार्यक्रमात बोलताना व्हान्स म्हणाले की, त्यांची पत्नी त्यांच्यासोबत चर्चमध्ये येत असली, तरी त्यांना आशा आहे की ख्रिस्ती सुवार्तेने तिला एकेदिवशी प्रेरित केले जाईल.
व्हान्स म्हणाले, ‘माझी मनापासून इच्छा आहे, कारण माझा ख्रिस्ती सुवार्तेवर विश्वास आहे आणि मला आशा आहे की माझ्या पत्नीलाही ते एके दिवशी पटेल.’ ते पुढे म्हणाले की, त्यांच्या भिन्न धार्मिक समजुतींमुळे त्यांच्या विवाहात कोणताही संघर्ष नाही. ‘जर तिने तो स्वीकारला नाही, तर देव म्हणतो की प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा आहे, त्यामुळे माझ्यासाठी ती समस्या नाही. ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत आणि ज्या व्यक्तीवर प्रेम करता, तिच्यासोबत सोडवता.’
व्हान्स यांच्या या वक्तव्यानंतर ऑनलाईन जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. काहींनी त्यांच्यावर हिंदुफोबिक (हिंदू विरोधी) असल्याचा आणि पत्नीवर ख्रिस्ती धर्म लादण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. एका वापरकर्त्याने वान्स यांना ढोंगी म्हटले, कारण उपराष्ट्राध्यक्षांनी पूर्वी स्वतःच्या धर्मातील स्वारस्य पुन्हा जागृत करण्याचे श्रेय पत्नीच्या श्रद्धेला दिले होते.
1) उपराष्ट्राध्यक्ष वान्स यांनी सार्वजनिक कार्यक्रमात पत्नीच्या धर्मपरिवर्तनाची इच्छा व्यक्त केली.
2) त्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी हिंदुफोबिक असल्याचा आरोप करत टीका केली आहे.
3) वान्स यांनी स्पष्ट केले की, धर्मातील भिन्नतेमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या नाही.
4) हे जोडपे आपल्या तीन मुलांना मात्र ख्रिस्ती म्हणून वाढवत आहे.