कॅराकास : व्हेनेझुएलाच्या उत्तर किनारपट्टीला लागोपाठ बसलेल्या दोन अत्यंत विनाशकारी भूकंपात आतापर्यंत ९२० जणांचे मृतदेह सापडले असून ४,३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. हजारो लोक अद्यापही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असल्याने मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय मदत पथके आल्यानंतर दोन तासांत मृतांची संख्या तिपटीने वाढली.
बुधवारी दुपारी ४० सेकंदांपेक्षाही कमी कालावधीत ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंप झाले. हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ‘ला ग्वैरा’ परिसराला अधिकृतपणे आपत्ती क्षेत्र घोषित केले आहे. हवाई सर्वेक्षणातून मिळालेल्या दृश्यांवरून या भागातील भीषणता स्पष्ट झाली. कॅरेबियन समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्टस् आणि शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. केवळ ला ग्वैरा भागातच १०० हून अधिक मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यात रिटासोल पॅलेस ही निवासी इमारत आणि एडुआर्डस् हॉटेलचा समावेश आहे. राजधानी कॅराकास जवळील ‘सायमन बोलिव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ’देखील या भूकंपांमुळे रसातळाला गेले आहे.
पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे : मार्को रुबियो
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितले की, कोसळलेल्या बहुमजली इमारतींच्या ढिगाऱ्यातून लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पुढील ७२ तास म्हणजेच ‘गोल्डन अवर्स’ अत्यंत महत्त्वाचे आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय व्हेनेझुएलात शोध आणि बचाव पथके तैनात करण्यासाठी मदत करत आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी संस्थेने आपली पथके तत्काळ रवाना केली आहेत.
जागतिक स्तरावरून मदतीचा ओघ
व्हेनेझुएला आधीच आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असताना या नव्या संकटामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. या कठीण काळात फ्रान्सने ८५ तज्ज्ञ बचावकर्त्यांचे पथक पाठवले असून ब्राझील, मेक्सिको, स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा आणि कतार यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व सरकारी यंत्रणांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले असून मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून अमेरिकेने व्हेनेझुएलावरील काही आर्थिक निर्बंध २३ ऑक्टोबरपर्यंत शिथिल केले आहेत. हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी जागतिक समुदायाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल आभार मानले आहेत आणि स्थानिक उद्योगपतींना अवजड बांधकाम यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.
लागोपाठ दोन तीव्र धक्के : व्हेनेझुएलामध्ये ४० सेकंदांच्या आत ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भीषण भूकंप झाले.
मोठी जीवित व वित्तहानी : या आपत्तीत आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला असून, ४,३०० हून अधिक लोक जखमी, हजारो नागरिक अद्याप गायब आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्ध्वस्त : राजधानीजवळील सायमन बोलिव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ला ग्वैरा राज्यातील १०० हून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या.