वॉशिंग्टन : अमेरिकेत रविवारी आलेल्या भीषण हिमवादळामुळे अनेक राज्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. अमेरिकेत गेल्या 10 वर्षांतील हे सर्वात भयंकर हिमवादळ असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंटकी, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, कॅन्सस, आर्कान्सा आणि मिसूरी या सात राज्यांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
या वादळाचा अमेरिकेतील सहा कोटींहून अधिक लोकांना फटका बसू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या हवामान खात्याने दिला आहे. वास्तविक, ऊबदार असलेल्या फ्लोरिडामध्येही जोरदार हिमवर्षाव होत आहे. कॅन्सस आणि मिसुरी या राज्यांतील अनेक भागात 8 इंचांपर्यंत हिमवर्षाव होऊ शकतो. तेथे ताशी 72 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या हिमवादळामागे ध्रुवीय भोवरे (पोलर व्होर्टेक्स) हे कारण मानले जात असून, ते घडाळ्याच्या उलट दिशेने वाहत आहे.
अशा प्रकारची स्थिती सध्या अमेरिकेत निर्माण होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे ध्रुवीय वारे युरोप आणि आशियामध्ये वाहू शकतात. ध्रुवीय भोवरा सुरू असताना घराबाहेर पडणे खूपच धोकादायक ठरू शकते. यावेळी हिवाळ्यातील ऊबदार कपड्यांशिवाय बाहेर पडल्यास 5 ते 7 मिनिटांत हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. इतकेच नाही तर त्वचाही गोठू शकते आणि अशा हवामानात गाडीही सुरू होत नाही. गेल्या काही वर्षांत आर्क्टिक महासागर झपाट्याने गरम होत आहे. त्यामुळे ध्रुवीय भोवरा दक्षिणेकडे सरकत आहे. अमेरिकेतील इंडियाना राज्यात परिस्थिती इतकी भयानक आहे की, अर्ध्या तासाने रस्त्यांवरून बर्फ हटवल्यानंतरही परिस्थिती जैसे थे होते.
रेल्वे, विमान उड्डाणे रद्द
जोरदार थंड वार्यामुळे शिकागो ते न्यूयॉर्क आणि सेंट लुईसकडे जाणारी सर्व विमान उड्डाणे आणि रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. केंटकी राज्यात हिमवर्षावाच्या नव्या विक्रमाची नोंद झाली असून, राज्यातील काही भागात 10 इंचांपेक्षा अधिक हिमवर्षाव झाला आहे. त्याशिवाय लेक्सिंग्टनमध्ये 5 इंचांपेक्षा अधिक हिमवर्षावाची नोंद झाली आहे.