वॉशिंग्टन डीसी; वृत्तसंस्था : अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपली लष्करी उपस्थिती आणखी वाढवण्यास सुरुवात केली आहे. सुमारे ९ हजार सैनिकांसह ‘यूएसएस थियोडोर रूजवेल्ट’ ही अमेरिकी विमानवाहू युद्धनौका मध्य पूर्वेकडे रवाना करण्यात येत आहे. या तैनातीमुळे ऑक्टोबरच्या अखेरीस या भागात अमेरिकेच्या तीन विमानवाहू युद्धनौका उपस्थित असण्याची शक्यता आहे. सध्या यूएसएस जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन या युद्धनौका या क्षेत्रात तैनात असल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेची ही वाढती लष्करी तैनाती इराणसोबतचा संघर्ष आणि संभाव्य पुढील लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर होत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी ३ नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवरील हल्ले पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली होती. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनीही राष्ट्राध्यक्षांनी लष्करी कारवाईचा आदेश दिल्यास अमेरिकी सैन्य त्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत इराणच्या आसपास तीन युद्धनौका आणि दोन मरीन युनिट तैनात होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील कारवाईचा निर्णय राष्ट्राध्यक्षांच्या आदेशावर अवलंबून असेल. अमेरिकेच्या मते, इराणची अण्वस्त्रनिर्मितीची क्षमता रोखणे हा लष्करी कारवाईमागील प्रमुख उद्देश आहे. दुसरीकडे, इराणने आपला अणुकार्यक्रम शांततामय उद्देशांसाठी असल्याचे सांगत अणुतंत्रज्ञानाच्या वापराचा अधिकार असल्याचा दावा केला आहे.
इराणचा प्रस्ताव नाकारला
दरम्यान, ट्रम्प यांनी इराणचा अलीकडील युद्धविराम प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले आहे. इराणने युद्धविरामाच्या बदल्यात होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची तयारी दर्शवली होती. तसेच इराणच्या परदेशातील गोठवलेल्या मालमत्ता व निधीवरील निर्बंध हटवणे आणि तेल विक्रीची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्या मते, या मागण्या जूनमध्ये झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामासाठीच्या सामंजस्य करारातील मागण्यांशी संबंधित आहेत.
सात महिन्यांपासून संघर्ष
अमेरिका आणि इराणमधील सध्याचा संघर्ष २८ फेब्रुवारीपासून सुरू असल्याचे दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर इराणने इस्रायल तसेच आखाती देशांमधील अमेरिकी लष्करी तळांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे.