Donald Trump USA 12 countries banned |
अमेरिका : कोलोरॅडोमध्ये इस्रायल समर्थक गटावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. यासोबतच, इतर ७ देशांमधून येणाऱ्या लोकांवर अंशतः निर्बंध लादण्यात आले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी असे धोरण स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात त्यांनी ७ मुस्लिम बहुल देशांमधून प्रवास करण्यास बंदी घातली होती, जी नंतर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचे आणि माझ्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यासह १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या देशांचे नागरिक आता अमेरिकेत प्रवेश करू शकणार नाहीत. ही बंदी सोमवारी रात्री १२:०१ वाजल्यापासून लागू होईल. याशिवाय ट्रम्प यांनी इतर ७ देशांमधून येणाऱ्या लोकांनाही काही अटींसह बंदी घातली आहे. यामध्ये बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे. या देशांमधून येणाऱ्या लोकांना आता विशेष अटी आणि कडक तपासणी होईल.
ज्या देशांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे ते देश सुरक्षा तपासणीत अपयशी ठरले आहेत. ते अमेरिकेसाठी गंभीर धोका मानले जातात. हे पाऊल ट्रम्प यांच्या धोरणाचा विस्तार आहे, जे त्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (२०१७) सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी ७ मुस्लिम बहुल देशांमधील (इराक, सीरिया, इराण, सुदान, लिबिया, सोमालिया, येमेन) नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.