US New Tariffs | भारत, चीनसह अनेक देशांवर अमेरिका लादणार नवे टॅरिफ 
आंतरराष्ट्रीय

US New Tariffs | भारत, चीनसह अनेक देशांवर अमेरिका लादणार नवे टॅरिफ

ट्रम्प प्रशासनाची तयारी सुरू

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन भारत, चीन आणि युरोपियन युनियनसह डझनभर देशांवर उच्च आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची तयारी करत आहे. देशांतर्गत उत्पादनाला सरकारी अनुदान देऊन अमेरिकन कंपन्यांचे नुकसान करणाऱ्या देशांविरुद्ध ही कारवाई केली जाणार आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर या आठवड्यात हा चौकशी अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

चीन, युरोपियन युनियन आणि इतर १४ देशांनी आपल्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान दिले आहे. यामुळे या देशांमध्ये गरजेपेक्षा जास्त औद्योगिक उत्पादन क्षमता निर्माण झाली असून, त्यांच्या कंपन्या जागतिक बाजारपेठेत स्वस्त दरात माल विकत आहेत. अमेरिकन उत्पादकांना स्पर्धेत मोठा फटका बसत आहे. या नव्या शुल्कातून पोलाद (स्टील), ॲल्युमिनियम आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला वगळले जाण्याची शक्यता आहे.

काय परिणाम होणार?

१) युरोप, जपान आणि दक्षिण कोरिया : या देशांनी यापूर्वीच अमेरिकेशी व्यापार करार केले असल्याने त्यांच्यावर १५ टक्के किंवा त्याहून कमी टॅरिफ लादले जाऊ शकते.

२) भारत आणि व्हिएतनाम : या देशांवर तुलनेने अधिक टॅरिफ लावले जाण्याची शक्यता असून, अंतिम दर त्यांच्या अमेरिकेशी होणाऱ्या व्यापार कराराच्या अटींवर अवलंबून असतील. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू आहे.

अतिरिक्त कराचा बोजा

हे नवे शुल्क जुलै महिन्यात जाहीर केलेल्या १० ते १२.५ टक्के करांच्या वर लादले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘एनव्हिडिया’ कंपनीच्या प्रगत एआय चिप्सच्या चीनमधील कथित तस्करीवरून ट्रम्प प्रशासनावर दोन्ही पक्षांकडून टीका होत आहे. या वादावरून लक्ष विचलित करण्यासाठीही या आठवड्यात टॅरिफची घोषणा केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT