पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील जॉर्जिया शहरातील शाळेत (Georgia school shooting) बुधवारी (दि.४) सकाळी १० च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी १४ वर्षीय संशयित मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
माहितीनुसार, अमेरिकेतील जॉर्जियाच्या बॅरो काउंटीमधील अपलाची हायस्कूलमध्ये गोळीबार झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक ख्रिस होसी यांनी मीडियाला सांगितले की, ठार झालेल्यांमध्ये दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. तर नऊजण लोक जखमी आहेत. घटनास्थळावरून जाण्याच्या प्रयत्नात अनेक जण जखमी झाले आहेत. ही शाळा जॉर्जिया राज्याची राजधानी अटलांटापासून सुमारे ४५ मैल (७० किलोमीटर) ईशान्येस विंडर शहरात आहे. दरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे वय १४ असुन त्याचे नाव कोल्ट ग्रे असे आहे.
या गोळीबार प्रकरणी १४ वर्षीय संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक ख्रिस होसी म्हणाले, संशयितावर खुनाचा आरोप लावला जाईल आणि प्रौढ म्हणून प्रक्रिया केली जाईल. पीडितांची सार्वजनिकरित्या ओळख पटलेली नाही.