वॉशिंग्टन : अमेरिकेने पुन्हा एकदा भारताच्या उच्च आयात करांचा मुद्दा उपस्थित केला आहे. विशेषतः अमेरिकन मद्य आणि कृषी उत्पादनांवरील उच्च आयात करांवर आक्षेप घेतला.
व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत मंगळवारी प्रेस सचिव कॅरोलिन लीव्हिट यांनी भारतावरील आयात कर धोरणांबाबत भाष्य केले. लीव्हिट यांनी भारतातील उच्च आयात कराबद्दलही आक्षेप नोंदवला आणि एक आकडेवारी दर्शवणारा तक्ता सादर केला. त्या म्हणाल्या, भारत, अमेरिकन अल्कोहोलवर 150 टक्के कर आकारतो. तुम्हाला वाटते का की त्यामुळे केंटकी बर्बन भारतात निर्यात होईल? मला नाही वाटत भारतातून कृषी उत्पादनांवर 100 टक्के कर आहे. जपानमध्ये तांदळावर 700 टक्के कर आहे. या चार्टमध्ये भारताच्या टॅरिफ दरांना विशेष रंगवून दाखवले होते आणि त्यावर ठळकपणे भारतीय तिरंग्याचे रंग वापरण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या उच्च आयात शुल्कावर सातत्याने टीका करत आहेत. शुक्रवारी त्यांनी सांगितले की, भारताने आता आपले टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्यास सहमती दर्शवली आहे.