वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी, ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या भारतीय मूळ असलेल्या उमेदवार कमला हॅरिस आणि विरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला संपूर्ण जोर प्रचारात लावलेला आहे. काट्याची टक्कर दोन्ही उमेदवारांत आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांनी मिळविलेल्या लंका विजयात एका खारीचाही वाटा होता, असे आपल्याकडे मानले जाते. आता अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतही एक खार आपला वाटा उचलत आहे. निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना ही खारूताई सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्ष व विरोधी रिपब्लिकन पक्षात आरोप- प्रत्यारोपाचा विषय बनली आहे. पीनट नावाची ही खार सोशल मीडियावर इतकी व्हायरल होत आहे, की निवडणुकीच्या निकालावर तिचा प्रभाव ठरलेला आहे, असे राजकीय विश्लेषकांतून मानले जात आहे. पीनट नावाच्या या खारीला शनिवारी (२ नोव्हेंबर) न्यूयॉर्कमध्ये बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ठार मारले. पीनट खारीच्या मृत्यूनंतर, राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांनी हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. पीनटचा मृत्यू हा बायडेन सरकारच्या क्रौर्याचा पुरावा आहे, अशी टीका या दोघांनी केली आहे. टेस्लाचे अध्यक्ष एलन मस्क यांनीही, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास प्राण्यांना संरक्षण मिळेल, अशी ग्वाही दिली आहे.