अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे कुश देसाई यांची त्यांचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली आहे.  (source- @K_SDesai)
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत भारतीयांचा डंका! कुश देसाई बनले डोनाल्ड ट्रम्प यांचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी

रिकी गिल, सौरभ शर्मा यांचीही महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी मूळ भारतीय वंशाचे माजी पत्रकार कुश देसाई (Kush Desai) यांची त्यांचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली आहे. व्हाइट हाउसने याबाबत अधिकृत निवेदन जारी करत त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. याआधी देसाई यांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेशन २०२४ साठी डेप्युटी कम्युनिकेशन डायरेक्टर आणि आयोवाच्या रिपब्लिकन पक्षाचे कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

देसाई यांनी रिपब्लिकन नॅशनल कमिटीमध्ये डेप्युटी बॅटलग्राउंड स्टेट्स आणि पेनसिल्व्हेनिया कम्युनिकेशन्स डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले. ट्रम्प यांनी सर्व सातही बॅटलग्राउंड स्टेट्समध्ये विजय मिळवला. देसाई यांच्याकडे राजकीय विषयावर संवाद साधण्याचा व्यापक अनुभव आहे.

Who is Kush Desai | कोण आहेत कुश देसाई?

कुश देसाई यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, रिपब्लिकन नॅशनल कमिटीमध्ये रिसर्च अॅनालिस्ट म्हणून रुजू होण्याआधी देसाई यांनी वॉशिंग्टनमधील द डेली कॉलरमध्ये १० महिने रिपोर्टर म्हणून काम केले. त्यांनी न्यू हॅम्पशायरमधील हॅनोव्हर येथील आयव्ही लीग रिसर्च युनिर्व्हसिटीच्या डार्टमाउथ कॉलेजमधून कला शाखेतून पदवी शिक्षण घेतले. डार्टमाउथमध्ये शिकत असताना त्यांना प्रतिष्ठित जेम्स ओ फ्रीडमन प्रेसिडेन्शियल रिसर्च स्कॉलरशिप मिळाली होती. त्यांचे इंग्रजी आणि गुजराती या दोन्ही भाषेवर प्रभुत्व आहे.

भारतीय वंशाच्या तिघांकडे महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात मूळ भारतीय वंशाच्या तिघांची प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली आहे. ट्रम्प प्रशासनात रिकी गिल (Ricky Gill) हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत (NSC) दक्षिण आणि मध्य आशियाशी संबंधित वरिष्ठ संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तर सौरभ शर्मा (Saurabh Sharma) यांची राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे येथील कर्मचारी भरती आणि नियुक्त्यांची जबाबदारी असेल.

पॉलिटिकोच्या माहितीनुसार, सौरभ शर्मा यांचा जन्म बंगळूरमध्ये झाला. त्यांनी अमेरिकेच्या मोमेंटचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

डोनाल्‍ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांनी शपथविधीनंतर केलेल्या संबोधनात २० जानेवारी हा लिबरेशन डे असल्याचे नमूद केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT