पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी ४७ वर्षे जुन्या १९७७ च्या फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) ची अंमलबजावणी थांबवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकन आणि परदेशी कंपन्यांना व्यवसाय मिळविणे अथवा तो टिकवून ठेवण्यासाठी परदेशी सरकारांतील अधिकाऱ्यांना लाच देण्यापासून प्रतिबंधित करणारा हा कायदा आहे. या कायद्याचा वापर अदानी समूहाविरुद्ध लाचखोरीची चौकशी सुरू करण्यासाठी करण्यात आला होता. हा कायद्याच्या अंमलबजावणीस ट्रम्प प्रशासनाने स्थगिती दिली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ॲटर्नी जनरल पाम बॉन्डी यांना एफसीपीए कायद्याला स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. या कायद्यातर्गंत भारतीय अब्जाधीश आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) आणि त्यांचा पुतण्या सागर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या कायद्याला स्थगिती दिल्याने अदानी यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात, ॲटर्नी जनरल यांना १८० दिवसांच्या आत एफसीपीए अंतर्गत तपास आणि अंमलबजावणी कारवाई नियंत्रित करणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि धोरणांचा आढावा घेण्यास सांगितले आहे.
गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह सात जणांवर सिक्युरिटीज फसवणूक, वायर फ्रॉड आणि फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेत आरोप ठेवण्यात आले होते. सोलर पॉवर कॉन्ट्रक्ट्ससाठी अनुकूल अटींच्या बदल्यात भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे २,१०० कोटी रुपयांची (सुमारे २५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) लाच दिल्याचा अदानींवर आरोप आहे. दरम्यान, अदानी समुहाने अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप याआधीच फेटाळून लावले होते.