आंतरराष्ट्रीय

अमेरिकेकडून युक्रेनला क्लस्टर बॉम्ब!

Arun Patil

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : रशियाबरोबर युद्ध सुरू असताना अमेरिकेने युक्रेनला क्लस्टर बॉम्ब देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून देण्यात येणार्‍या संरक्षण साहित्य पॅकेजमध्ये क्लस्टर बॉम्बचा समावेश आहे. क्लस्टर बॉम्ब 155 मिमी हॉवित्झर तोफांतून डागली जातील, असे अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. क्लस्टर बॉम्बच्या वापरावर ब्रिटन, फ्रान्ससह 108 देशांत बंदी आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रीय सुरक्षा अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी युक्रेनला क्लस्टर शस्त्रे देण्याची सूचना केली.

2008 मध्ये क्लस्टर बॉम्बवर बंदी घालण्यासाठी 108 देशांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांचा समावेश आहे. ह्युमन राइट्स वॉचच्या (एचआरडब्लू) अहवालानुसार, रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करत आहेत. 2022 मध्ये युक्रेनने रशियाच्या कब्जातील भागात क्लस्टर बॉम्ब डागले होते. यात 8 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता.

झेलेन्स्कींकडून सातत्याने मागणी

एचआरडब्ल्यू अधिकारी मेरी वेरेहेम यांच्या म्हणण्यानुसार, युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर लोकांचा बळी घेण्यासाठी केला जात आहे. रशिया, अमेरिका आणि युक्रेन या देशांनी क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घालणार्‍या 2008 च्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अनेक दिवसांपासून अमेरिकेकडे क्लस्टर बॉम्बची मागणी करत आहे. क्लस्टर शस्त्रांच्या वापरामुळे रशियाचे तळ अगदी सहजपणे उद्ध्वस्त केले जाऊ शकतात, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT