Donald Trump Pudhari
आंतरराष्ट्रीय

Donald Trump | होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचा २० टक्‍के टोल

सुरक्षित वाहतुकीसाठी अमेरिका ताबा मिळवणार : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिका ताबा मिळवेल. त्याचे पालकत्व घेऊन त्यातील सुरक्षित वाहतुकीसाठी जहाजातील साहित्‍य किमतीवर २० टक्‍के टोल आकारू, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यामुळे जागतिक तेलपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिका ताबा मिळवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही खळबळजनक घोषणा केली. आम्ही या सामुद्रधुनीचे रक्षण करणार आहोत आणि त्याचे नियंत्रणही आमच्याकडेच घेणार आहोत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या बदल्यात रक्षण करण्यासाठी अमेरिकेला मोठी रक्कम मिळावी.

ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही या क्षेत्राचे रक्षक (गार्डियन) बनू. कदाचित आपण याला ‘गार्डियन एंजल’ असे नाव देऊ. या कामासाठी आम्हाला मोबदला मिळायलाच हवा; कारण इतर संबंधित देश खूप श्रीमंत आहेत. ते आमच्या बाजूने आहेत, त्यामुळे आम्ही विनामूल्य हे काम करावे, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. इराणसोबत झालेल्या १० करारांचा उल्लेख करत ट्रम्प यांनी आरोप केला की, इराणने नेहमीच करार मोडले आहेत, त्यामुळे आता त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

अमेरिकेचा ताबा : जागतिक तेलपुरवठ्याचा मुख्य मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिका नियंत्रण मिळवणार.

मोबदल्याची मागणी : सुरक्षिततेच्या बदल्यात श्रीमंत देशांकडून अमेरिका मोठ्या प्रमाणात निधी वसूल करणार.

जागतिक संकट : इराणच्या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून महागाईचा धोका वाढला आहे.

वाटाघाटी धोक्यात : दोन्ही देशांमधील वाढत्या लष्करी हल्ल्यांमुळे मागील महिन्यात झालेला अंतरिम शांतता करार मोडीत निघण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT