तेल अवीव; वृत्तसंस्था : गाझा युद्धविराम कराराची अंमलबजावणी आणि त्यावर देखरेख ठेवण्याच्या मोहिमेअंतर्गत अमेरिकन सैन्याचे इस्रायलमध्ये रात्रीतून आगमन सुरू झाले आहे. 200 सदस्यांची ही टीम शनिवार-रविवारपर्यंत दाखल होणार असून, ते अमेरिका आणि मध्य-पूर्वेतील इतर तळांवरून प्रवास करत आहेत. अमेरिकन कर्मचारी एक संयुक्त नियंत्रण केंद्र स्थापन करण्यास, गाझामध्ये प्रवेश करणाऱ्या विविध सुरक्षा दलांमध्ये समन्वय साधण्यास आणि इस्रायल संरक्षण दलांशी संपर्क साधण्यास मदत करतील.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेची सेंट्रल कमांड इस्रायलमध्ये एक ‘नागरी-सैन्य समन्वय केंद्र’ स्थापन करेल. दोन वर्षांच्या संघर्षामुळे उद्ध्वस्त झालेल्या या प्रदेशात मानवतावादी मदतीचे व्यवस्थापन करणे, तसेच लॉजिस्टिक आणि सुरक्षा सहाय्य पुरवणे हे या केंद्राचे काम असेल. गाझामध्ये प्रवेश करणाऱ्या बहुराष्ट्रीय सैन्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि त्यांना एकत्रित करण्यासाठी एक ‘संयुक्त नियंत्रण केंद्र’ स्थापन करणे ही अमेरिकेची मुख्य भूमिका आहे.