Iran America Conflict | इराणच्या सीमांवर अमेरिकन लष्कर तैनात 
आंतरराष्ट्रीय

Iran America Conflict | इराणच्या सीमांवर अमेरिकन लष्कर तैनात

इराणसमोर मोठे आव्हान : नागरिकांचा जीव मुठीत; आखात होरपळण्याची भीती

अरुण पाटील

तेहरान/वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेने मध्य पूर्वेत लष्करी उपस्थिती वाढवल्याने इराणवर मोठ्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणचे लष्करी तळ, अणुस्थळे, महत्त्वाची पायाभूत सुविधा आणि अगदी सर्वोच्च नेतृत्वही लक्ष्य होऊ शकते. गेल्यावर्षी इस्रायलबरोबरच्या 12 दिवसांच्या युद्धानंतर इराणची स्थिती कमकुवत झाली असली, तरी त्याच्याकडे अजूनही शेकडो क्षेपणास्त्रे उपलब्ध असल्याचे इस्रायली अंदाज सांगतात.

इराणकडे अल्प-पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे, ज्याद्वारे कतार, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि यूएईमधील अमेरिकी तळांना लक्ष्य करता येऊ शकते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांनी अमेरिकन युद्धनौका बुडवण्याचा इशारा दिला आहे. इराणचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत अमीर सईद इरावणी यांनीही प्रादेशिक अमेरिकी तळांना वैध लक्ष्य मानले जाईल, असे स्पष्ट केले. 2020 मध्ये वरिष्ठ जनरलच्या हत्येनंतर इराणने इराकमधील अमेरिकी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. तसेच, कतारमधील तळालाही लक्ष्य करण्यात आले होते. सुदैवाने या हल्ल्यांत जीवितहानी झाली नव्हती.

अणुकार्यक्रम आणि जीनिव्हा चर्चा

2015 चा अणुकरार अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केल्यानंतर इराणने युरेनियम संवर्धन वाढवले. अमेरिका आणि इराण यांच्यात जीनिव्हामध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरू असून, तोडगा निघाला नाही तर ‘वाईट परिणाम’ भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी जागतिक अर्थव्यवस्थेचा दाबबिंदू

होर्मुझ सामुद्रधुनी ही जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची समुद्रवाहिनी आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेलवाहतूक या मार्गाने होते. इराणने अलीकडील लष्करी सरावादरम्यान या सामुद्रधुनीचा काही भाग बंद केल्याचा दावा केला. 2019 मध्ये सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यामुळे उत्पादन निम्म्यावर आले होते. त्यावेळी जबाबदारी येमेनमधील हुती बंडखोरांनी स्वीकारली; मात्र अमेरिकेने इराणवर आरोप ठेवला होता.

* इराणकडे अजूनही शेकडो क्षेपणास्त्रांचा साठा उपलब्ध

* होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यास जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम

* अमेरिकी तळांवर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही

* अणुकार्यक्रमावरील जीनिव्हा चर्चा निर्णायक टप्प्यावर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT