आंतरराष्ट्रीय

Heartbreak Jackpot | अरेरे... यालाच म्‍हणतात नशीब! अवघ्‍या एक नंबर चुकला आणि हुकली १६,००० कोटींची लॉटरी !

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला खरेदी केले होते 'पॉवरबॉल' लॉटरीचे तिकीट

पुढारी वृत्तसेवा

पॉवरबॉल लॉटरी ही अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय लॉटरी आहे. यामध्ये जॅकपॉट जिंकण्याची शक्यता २९.२ कोटींमध्ये एक इतकी कमी असते.

Powerball Lottery 16000 Crore Jackpot

वॉशिंग्टन: नशीब जेव्हा थट्टा करतं, तेव्हा ते तुम्‍हाला केवळ निराश करत नाही तर, काही क्षण खूप काही गमावल्‍याची भावना निर्माण करते. तसेच काहीसे हजारो कोटी रुपये हातातोंडाशी आलेले असताना केवळ एका नंबरने गमावणे म्‍हणजे काय असतं, याचा प्रत्यय अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात राहणाऱ्या जेफ्री डायमंड यांना आला. त्‍यांचे तब्बल १६,८०९ कोटी रुपयांचे ($१.८७ अब्ज) जॅकपॉट बक्षीस अवघ्या एका नंबरमुळे हुकले. ही लॉटरी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लॉटरी मानली जात होती.

नेमकं काय घडलं?

स्पॉट्सिलव्हेनिया काउंटीतील जेफ्री डायमंड यांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला 'पॉवरबॉल' (Powerball) लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीचे विजयी क्रमांक ४-२५-३१-५२-५९ असे होता आणि 'पॉवरबॉल' क्रमांक १९ होता. जेफ्री यांनी 'इझी पिक' पद्धतीने तिकीट निवडले होते. मात्र, एका क्रमांकाच्या फरकामुळे त्यांना या महाकाय जॅकपॉटवर पाणी सोडावे लागले.

कोट्यवधी हुकले, पण लाखांचे बक्षीस मिळाले

जरी मुख्य जॅकपॉट हुकला असला, तरी जेफ्री यांचे नशीब पूर्णपणे फिरले असे नाही. त्यांनी पहिल्या पाचपैकी चार क्रमांक आणि 'पॉवरबॉल' क्रमांक अचूक जुळवले होते. नियमानुसार या विजयासाठी त्यांना ४४.९ लाख रुपये ($५०,०००) मिळणार होते. परंतु, तिकीट खरेदी करताना त्यांनी जादा एक डॉलर खर्च करून 'पॉवर प्ले' हा पर्याय निवडला होता, ज्यामुळे त्यांच्या बक्षिसाची रक्कम दुप्पट होऊन त्यांना ८९.८ लाख रुपये ($१००,०००) मिळाले.

मोठी संधी हुकली तरी आम्‍ही समाधानी आहोत....

विजयाचा आनंद आणि भविष्यातील बेत सुरुवातीला जेफ्री आणि त्यांच्या पत्नीला आपण बक्षीस जिंकलो आहोत याची कल्पनाच नव्हती. जेव्हा त्यांनी तिकीट स्कॅन केले, तेव्हा त्यांना मिळालेल्या रकमेचा संदेश आला. "इतकी मोठी संधी हुकली असली तरी आम्ही समाधानी आहोत. या पैशातून आम्ही आमच्या घराचे छप्पर आणि डेक दुरुस्त करणार आहोत," असे मोठ्या मनाने जेफ्री आणि त्‍यांच्‍या पत्‍नीने सांगितले.

काय आहे 'पॉवरबॉल' लॉटरी?

पॉवरबॉल लॉटरी ही अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय लॉटरी आहे. यामध्ये जॅकपॉट जिंकण्याची शक्यता २९.२ कोटींमध्ये एक इतकी कमी असते, त्यामुळेच यातील बक्षिसाची रक्कम वाढत जाऊन हजारो कोटींपर्यंत पोहोचते. मात्र, छोटी बक्षिसे जिंकण्याची शक्यता २५ मध्ये एक इतकी असते. अमेरिकेतील ४५ राज्यांमध्ये हा खेळ खेळला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT