American Airstrikes Iran | इराणवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले; बंदर अब्बासचे ग्राऊंड कंट्रोल स्टेशन उद्ध्वस्त 
आंतरराष्ट्रीय

American Airstrikes Iran | इराणवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले; बंदर अब्बासचे ग्राऊंड कंट्रोल स्टेशन उद्ध्वस्त

तीन स्फोटांनी इराण हादरले

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : तेहरान शांतता कराराला तयार न झाल्यास ‘काम फत्ते करू,’ अशी धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर अमेरिकेने गुरुवारी इराणच्या दक्षिणेकडील बंदर अब्बास शहरावर गुरुवारी पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले केले. यात तेथील ग्राऊंड कंट्रोल स्टेशन उद्ध्वस्त केल्याचा दावा ‘सेंटकॉम’ने केला आहे. इराणी नौदलप्रमुखांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यास दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, शांतता चर्चेत महत्त्वाचा मुद्दा असणार्‍या लेबनॉनवरील हल्ले इस्रायलने तीव्र केले आहेत. अमेरिकेने हे स्वसंरक्षणार्थ हल्ले केल्याचे नमूद केले आहे.

अंतरिम शांतता करार अंतिम टप्प्यात पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांची स्थिती नाजूक असतानाच गुरुवारी पहाटे बंदरांचे शहर असलेल्या बंदर अब्बासमध्ये तीन मोठे स्फोट झाल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले. ‌‘आज यूएस सेंट्रल कमांडच्या सैन्याने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ धोका निर्माण करणारे इराणचे चार वन-वे अटॅक ड्रोन (आत्मघाती ड्रोन) पाडले,‌’ अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली. ते पुढे म्हणाले, पाचवा ड्रोन सोडण्याची तयारी सुरू असतानाच अमेरिकन सैन्याने बंदर अब्बास येथील इराणच्या एका ग्राऊंड कंट्रोल स्टेशनवरही हल्ला करून ते नेस्तनाबूत केले.

सोमवारी रात्री झालेल्या हल्ल्यांनंतरही युद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे; परंतु त्यांचे सैन्य पहारा देत सज्ज आहे. इराणने बुधवारी सांगितले होते. ‌‘इराणचा इरादा पक्का आहे; त्यांना करार करायचा आहे. आतापर्यंत ते तिथपर्यंत पोहोचलेले नाहीत. आम्ही यावर समाधानी नाही; पण लवकरच होऊ,‌’ असे ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसच्या मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले.

कुवेतवर ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ला

कुवेत सिटी : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून गुरुवारी कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, यासाठी थेट इराणला जबाबदार धरले आहे. मंत्रालयाने या घटनेला इराणी प्रशासनाचा धोकादायक वाढता हस्तक्षेप, असे म्हटले आहे. गुरुवारी पहाटे कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणेने देशाच्या हद्दीत येणारे शत्रूचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. लष्कराने नागरिकांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हा हल्ला अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीतील इराणी तळांवर केलेल्या कारवाईनंतर झाला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याचे मान्य केले आहे. कुवेतमध्ये अमेरिकेचा मोठा हवाईतळ असल्याने या भागातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.

ओमानला धमकी

अमेरिकेचा दीर्घकाळ सहकारी असणाऱ्या ओमानलाही ट्रम्प यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट इशारा दिला. हे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आहे आणि ओमानला इतर सर्वांप्रमाणेच वागावे लागेल, नाही तर आम्हाला त्यांना उडवून द्यावे लागेल, असे ते म्हणाले.

ऊर्जा बाजार अस्थिर

या कराराचा मुख्य उद्देश होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील वाहतूक पूर्णपणे पूर्ववत करणे हा आहे. तेहरानने हा मार्ग प्रत्यक्षात बंद केल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजाराला तेल आणि वायूच्या मर्यादित पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. बुधवारी होर्मुझ खुली होण्याच्या शक्यतेने कच्च्या तेलाचे दर उतरले होते. गुरुवारच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे ते पुन्हा वाढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT