Crypto Pudhari
आंतरराष्ट्रीय

Crypto Cyber Heist : अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या क्रिप्टो करन्सी कंपनीवर ५२ हजार कोटींचा सायबर दरोडा

जगातील सर्वांत मोठी क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज म्हणून नावलौकिक, सायबर हल्ल्याचा उत्तर कोरियाच्या हॅकर्सवर संशय

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज कंपनी असलेल्या बायनान्सवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. या महासायबर हल्ल्यात सुमारे ६.३ अब्ज डॉलर्स (अंदाजे ५२,००० कोटी रुपये) चोरीला गेल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या सायबर दरोड्यात उत्तर कोरियाच्या सरकार पुरस्कृत हॅकर्सचा हात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

‘टीआरएम लॅब्स’ आणि ‘चेनालिसिस’ या आघाडीच्या क्रिप्टो विश्लेषण संस्थांच्या मते, उत्तर कोरियाच्या ‘ट्रेडरट्रेडर’ या कुख्यात हॅकिंग युनिटने हा हल्ला घडवून आणला आहे. उत्तर कोरियाचा क्रिप्टो चोरीचा मोठा इतिहास असून, गेल्या वर्षी टोकियोतील एक्स्चेंजमधून १.५ अब्ज डॉलर्स लुटल्याचा आरोपही एफबीआयने याच गटावर ठेवला होता.

एका लॅपटॉपवरून सुरक्षा भेदली

प्राथमिक तपासानुसार, बायनान्सच्या एका अभियंत्याचा लॅपटॉप हॅक करून घुसखोरांनी मुख्य प्रणालीत प्रवेश मिळवला आणि अनधिकृतपणे व्यवहार पूर्ण केले. कंपनीने तातडीने पावले उचलत सुमारे ३ अब्ज डॉलर्सची मालमत्ता गोठवली आहे. ‘टेदर’ने १.५७ अब्ज डॉलर्स तर ‘सर्कल’ने ८०० दशलक्ष डॉलर्सचे व्यवहार रोखले आहेत. मात्र, उर्वरित ३.३ अब्ज डॉलर्सबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

ग्राहकांचे पैसे सुरक्षित : बायनान्सचे आश्वासन

बायनान्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड टेंग आणि सहसंस्थापक यी हे यांनी ग्राहकांना आश्वस्त केले आहे की, सर्व नुकसान कंपनी भरून देईल. सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या खात्यांमधून पैसे काढणे आणि जमा करणे तात्पुरते थांबवण्यात आले आहे. जागतिक स्तरावर ३३.५ कोटींहून अधिक ग्राहक असलेल्या या कंपनीकडे सुमारे १६२.८ अब्ज डॉलर्सची मालमत्ता देखरेखीखाली आहे. कंपनीचे संस्थापक चांगपेंग झाओ यांनीही ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत ग्राहकांच्या रकमा सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

क्रिप्टो बाजारात मोठी घसरण

या ऐतिहासिक चोरीच्या वृत्तानंतर जागतिक वित्तीय बाजारात खळबळ उडाली.

  • बिटकॉईन : तीन टक्क्यांहून अधिक घसरून ७६,३६८ डॉलर्सच्या सहा आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

  • कॉईनबेस : शेअर्समध्ये ४.८ टक्क्यांची घसरण झाली.

  • स्ट्रॅटेजी : शेअर्स जवळपास ६ टक्क्यांनी घसरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT