बगदाद; वृत्तसंस्था : पश्चिम इराकमध्ये कोसळलेल्या अमेरिकन लष्करी विमानातील सर्व सहा कर्मचार्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे.
केसी-135 (-135) प्रकारचे लष्करी इंधन भरणारे विमान गुरुवारी पश्चिम इराकमध्ये कोसळले. लष्कराच्या माहितीनुसार या घटनेत आणखी एका विमानाचा सहभाग होता. मात्र, हा अपघात शत्रू किंवा मैत्रीपूर्ण गोळीबारामुळे झालेला नाही. इराकच्या पश्चिमेकडील वाळवंटी भागात मोठ्या प्रमाणावर ओसाड खडकाळ मैदान आहे. मात्र, याच भागात इराण समर्थित शिया मिलिशियांचे अनेक तळ आहेत आणि येथे इस्रायल व अमेरिकेकडून वारंवार हवाई हल्ले झाले आहेत.
दरम्यान, इराकच्या स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेशात झालेल्या एका हल्ल्यात फ्रान्सचा एक सैनिक ठार झाल्याची माहिती फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी दिली. या युद्धात मृत्यू पावलेला हा पहिला फ्रेंच सैनिक आहे. मागील महिन्यात अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध संयुक्त हल्ले सुरू केल्यानंतर मध्यपूर्वेत युद्धसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर इराण समर्थक गटांकडून परदेशी सैन्य तैनात असलेल्या भागांवर अनेक हल्ले झाले आहेत.
इराणविरुद्धच्या कारवायांसाठी अमेरिकेने मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर लष्करी विमाने पाठवली आहेत आणि पाडलेल्या वैमानिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष शोध व बचाव पथके तैनात केली आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) दिलेल्या निवेदनानुसार, विमान कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू आहे. अपघातात सहभागी असलेले दुसरे विमान सुरक्षितपणे उतरले. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ दरम्यान मैत्रीपूर्ण हवाई क्षेत्रात हा अपघात झाला असून, बचावकार्य सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 28 फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर अमेरिकेची चार विमाने गमावली गेली आहेत. यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला कुवैतच्या हवाई संरक्षण प्रणालीने चुकून अमेरिकेची तीन लढाऊ विमाने पाडली होती. त्यावेळी सर्व वैमानिक सुरक्षित बाहेर पडले होते. या अपघातात इराणचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले आहे.
फ्रेंच हितसंबंध टार्गेटवर
इराकमधील इराण समर्थक ‘अशाब अलकहफ’ या गटाने टेलिग्रामवर इशारा देत सांगितले की, फ्रेंच विमानवाहू नौका आल्यामुळे ‘इराक आणि परिसरातील फ्रेंच हितसंबंधांवर लक्ष्य केले जाईल.’ या संघर्षात आतापर्यंत 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 150 जण जखमी झाले आहेत. इराणमधील मृतांचा आकडा 1,300 पेक्षा जास्त असल्याचे त्या देशाच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूतांनी सांगितले.