वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे 261 व्हेनेझुएलाच्या स्थलांतरितांना एल. साल्वाडोरच्या सुपरमॅक्स तुरुंगात धाडले आहे. ड्रग्ज विकणार्या टोळ्यांचे सदस्य असल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी त्यांना तुरुंगात डांबले आहे.
एल. साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, व्हेनेझुएलाच्या ‘ट्रेन डी अरागुआ’ टोळीचे 238 सदस्य आणि आंतरराष्ट्रीय टोळी एमएस-13 चे 23 सदस्य एल. साल्वाडोरमध्ये पोहोचले आहेत. या स्थलांतरितांना हद्दपार करण्याच्या आदेशाला अमेरिकन न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही. अमेरिकेने त्यांना हद्दपार केले आहे. न्यायालयाचा आदेश येण्यापूर्वीच स्थलांतरितांना घेऊन विमानांची उड्डाणे झाली होती, असे अमेरिकन सरकारने सांगितले. एल. साल्वाडोरमध्ये पोहोचलेल्या स्थलांतरितांचा व्हिडीओ बुकेले यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, यामध्ये हातकड्या घातलेल्या स्थलांतरितांना विमानातून खाली उतरवून जबरदस्तीने तुरुंगात डांबले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले की, प्रशासनाने कोणत्याही न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केलेले नाही. हा आदेश कायदेशीरद़ृष्ट्या निराधार होता.
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणार्या कोणत्याही गुन्हेगाराला मूळ देश कोणताही असो, एल. साल्वाडोरच्या तुरुंगात ठेवले जाईल, असे अमेरिकन प्रशासनाने सांगितले. जानेवारी 2023 मध्ये एल. साल्वाडोरमध्ये एक तुरुंग बांधण्यात आला. त्याचे नाव ‘दहशतवाद्यांचे कारावास केंद्र’ असे आहे. हे जगातील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. त्यात 40 हजारांहून अधिक कैदी ठेवता येतात.