US tariffs on India file photo
आंतरराष्ट्रीय

US tariffs on India : अमेरिकेचा भारताला मोठा झटका; उद्यापासून भारतीय वस्तूंवर ५०% आयात शुल्क, मसुदा नोटीस जारी

अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने (CBP) २७ ऑगस्टपासून भारतीय उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याबाबत एक मसुदा नोटीस जारी केली आहे.

मोहन कारंडे

US tariffs on India

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर, अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने २७ ऑगस्टपासून भारतीय उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याबाबत मसूदा नोटीस जारी केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, रशियन सरकारकडून अमेरिकेला मिळालेल्या धमक्यांना प्रतिसाद म्हणून हे शुल्क लादले जात आहे. या धोरणानुसार भारताला नवीन शुल्कांना सामोरे जावे लागेल. उद्या म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी रात्री १२:०१ नंतर अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व भारतीय वस्तूंवर ५० टक्के शुल्क लागू होईल. आपल्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाला लक्षात घेऊन अमेरिकेने रशियाकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर आधीच बंदी घातली आहे, असेही या सूचनेत म्हटले आहे.

ट्रम्प यांनी सुरुवातीला व्यापक व्यापार युद्धाचा भाग म्हणून भारतावर २५% दंडात्मक शुल्काची घोषणा केली होती. या व्यापार युद्धात त्यांनी ९० हून अधिक देशांवर शुल्क लादले होते. त्यानंतर ३० जुलै रोजी त्यांनी आणखी २५% अतिरिक्त शुल्काची घोषणा केली. भारताने रशियाकडून केलेल्या तेल खरेदीबद्दल याला दंड म्हणत एकूण शुल्क ५०% पर्यंत नेले आहे. गेल्या महिन्यात शुल्काची घोषणा करताना ट्रम्प यांनी आरोप केला होता की, "भारतात इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वात कठोर आणि आक्षेपार्ह गैर-आर्थिक व्यापारी अडथळे आहेत."

कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही: पंतप्रधान मोदी

अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५०% शुल्क लावण्याच्या निर्णयापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ठाम भूमिका घेतली. अमेरिकेच्या आर्थिक दबावाची पर्वा न करता सरकार यातून मार्ग काढेल, असे ते म्हणाले. त्यांनी लहान दुकानदार, शेतकरी आणि पशुपालकांना आश्वासन दिले की सरकार त्यांच्या हिताचे रक्षण करेल. "आम्ही कोणताही दबाव सहन करू, पण मोदी तुम्हाला कधीही नुकसान होऊ देणार नाहीत," असे मोदी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT