donald trump  file photo
आंतरराष्ट्रीय

US Israel Iran War: "आम्ही लक्ष्याच्या अत्यंत जवळ" युद्ध थांबवण्याबाबत ट्रम्प यांचे मोठे संकेत; इराणवरील तेल निर्बंध शिथिल

इराणसोबतच्या युद्धात अमेरिका आपली उद्दिष्टे साध्य करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

मोहन कारंडे

US-Israel vs Iran War:

वॉशिंगटन: इराणसोबतच्या युद्धात अमेरिका आपली उद्दिष्टे साध्य करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मध्यपूर्वेमध्ये अमेरिकेचे हजारो सैनिक तैनात आहेत आणि पेंटागॉनने या संघर्षासाठी निधी पुरवण्याकरिता काँग्रेसकडे अतिरिक्त २०० अब्ज डॉलर्सची मागणी केली आहे.

'ए.पी.' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या किमतींना आळा घालण्याच्या उद्देशाने अमेरिकेने शनिवारी समुद्रातील टँकर्सवर अडकलेल्या इराणी तेलावरील निर्बंध १९ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहेत. तेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींना नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडील पर्याय आता संपुष्टात येत असल्याचे दिसत असतानाच, हा निर्णय घेण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की, इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी प्रयत्नांमध्ये अमेरिका आपल्या उद्दिष्टांच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे आणि आता या कारवाया टप्प्याटप्प्याने थांबवण्याचा विचार केला जात आहे.

या प्रमुख उद्दिष्टांमध्ये इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेचे संपूर्ण नुकसान करणे, त्यांची संरक्षण उत्पादन व्यवस्था उद्ध्वस्त करणे, तसेच नौदल आणि हवाई दल पूर्णपणे निष्क्रिय करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, इराणला कोणत्याही परिस्थितीत अणु क्षमता प्राप्त होऊ न देणे हे अमेरिकेचे प्रमुख ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगितले. यामध्ये इस्रायल, सौदी अरेबिया, युएई, बहरीन, आणि कुवैत या देशांच्या सुरक्षेलाही प्राध्यान्य देत असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाचे म्हणजे, होर्मुझची सामुद्रधूनी या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गाच्या सुरक्षेबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या जलमार्गाचे संरक्षण हे त्याचा वापर करणाऱ्या देशांनीच करावे, असे त्यांनी म्हटले असून, आवश्यक असल्यास अमेरिका मदत करेल, मात्र भविष्यात इराणचा धोका पूर्णपणे संपल्यानंतर ही गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT