अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तेहरानच्या आकाशात असे धुराचे लोट उठले होते.  ( फोटो पीटीआय)
आंतरराष्ट्रीय

US-Israel Attacks Iran | अमेरिका, इस्रायलचा इराणवर हल्ला; इराणचे संरक्षणमंत्री नसिराजादेह, लष्कराचा कमांडर मोहम्मद पाकपौर ठार

तेहरान हादरले; ८५ ठार; इस्त्रायलच्या हल्ल्यात मिनावमधील ५० विद्यार्थिनींचाही मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

तेहरान/जेरुसलेम; वृत्तसंस्था : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शनिवारी टिपेला पोहोचला. या तणावाचा स्फोट झाल्याने इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्तरीत्या क्षेपणास्त्र हल्ला चढवला. इस्रायलने भरदिवसा इराणची राजधानी तेहरानवर कित्येक क्षेपणास्त्रे डागली. राजधानी तेहरानसह लष्करी तळ आणि सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यात आले. तेहरानवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करण्यात आला. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या या संयुक्त हल्ल्याने जग हादरले आहे. इस्रायल हल्ल्यात इराणचे संरक्षणमंत्री नसिराजादेह आणि आयआरजीसी कमांडर मोहम्मद पाकपौर ठार झाल्याचे वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेने दिले आहे. या हल्ल्यात इराणमधील 85 जण ठार झाले आहेत. मिनाब येथील एका प्राथमिक शाळेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 50 वर विद्यार्थिंनींचा मृत्यू झाल्याचा दावा इराणी अधिकार्‍यांनी केला आहे. या शाळेत 170 विद्यार्थी होते. या भीषण रक्तपातानंतर इराणनेही इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या 7 देशांमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करीत जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, इराणने होरमूझची सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केली. याचा विपरीत परिणाम भारतासह जागतिक व्यापारावर होणार आहे.

इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यानंतर तेहरानच्या मध्यवर्ती भागातून धुराचे लोट आकाशात उठताना दिसत होते. विशेष म्हणजे पहिला हल्ला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. इराणनेही आपल्यावर झालेल्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचे समर्थन केले आहे.

इस्रायलची ‘सिंहगर्जना’ तर अमेरिकेचा ‘भयंकर राग’

इस्रायलने इराणविरुद्धच्या आपल्या नवीन मोहिमेला ‘सिंहगर्जना’ असे नाव दिले आहे; तर अमेरिकेने इराणवरील हल्ल्याला ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव दिले. एपिक फ्युरी म्हणजे ‘अत्यंत तीव्र आणि भयंकर राग’. अल जझीराने अमेरिकन अधिकार्‍यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, ही अमेरिका आणि इस्रायलमधील संयुक्त लष्करी कारवाई आहे. या युद्धामुळे केवळ इस्रायल आणि इराणच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणाव वाढू शकतो.

खामेनी आणि पेझेश्कियान यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

इस्रायली अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, या हल्ल्यात नेमके काय साध्य झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, तेहरानमधील खामेनी यांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले असून शहरात ठिकठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

शाळेवरील हल्ल्याचा बदला म्हणून इराणने मध्य पूर्वेतील सर्व अमेरिकन हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे इराक, संयुक्त अरब अमिराती आणि कतारमध्ये अनेक मोठे स्फोट झाले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने (आयआरजीसी) इस्रायलच्या दिशेने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागल्याची घोषणा केली आहे.

इस्रायलच्या लष्करी कारवाईची माहिती असलेल्या एका अधिकार्‍याने सांगितले की, इस्रायलने इराणची लष्करी तळे, सरकारी चिन्हे आणि गुप्तचर विभागाची ठिकाणे यांना लक्ष्य केले आहे.

तेहरानमधील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनी यांच्या कार्यालयाजवळ पहिला प्रचंड स्फोट झाला. इराणच्या सरकारी टेलिव्हिजननेही या स्फोटाचे वृत्त दिले आहे. संयुक्त हल्ल्यानंतर तेहरानमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारी इमारती, लष्करी तळ आणि गुप्तचर विभागाची कार्यालये इस्रायलच्या निशाण्यावर आहेत. राजधानीत अनेक रस्ते बंद करण्यात आले असून लष्करी हालचाली वाढल्या आहेत.

इस्रायलमध्ये हाय अलर्ट

हल्ल्याच्या दरम्यान इस्रायलने आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली असून देशभरात धोक्याचे सायरन वाजवण्यात आले. इस्रायली लष्कराने जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. इराणकडून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे लष्कराकडून सांगण्यात आले.

इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी (सेफ रूम्स) आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत. इराणकडून डागलेली क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी आमची संरक्षण यंत्रणा (एअर डिफेन्स) सक्रिय आहे, असे आयडीएफने सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे. उत्तर इस्रायलमध्ये इराणच्या हल्ल्यानंतर भीषण स्फोट झाले असून अद्याप जीवितहानीचा तपशील हाती आलेला नाही.

या हल्ल्यामुळे इराण आणि पाश्चात्य देशांमधील अण्वस्त्र विवादावर राजनैतिक तोडगा निघण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील अणुकरार आणि त्यानंतर तो मोडीत निघाल्यानंतर गेल्या दशकात हा तणाव कमालीचा वाढला आहे. तेव्हापासून या भागात अनेकदा अशांतता आणि युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तणावाच्या या ताज्या लाटेची मुळे इराणमधील अंतर्गत निदर्शनांमध्ये दडलेली आहेत. तेथील महागाई, कोसळलेली अर्थव्यवस्था आणि अमेरिका-तेहरान यांच्यातील अणुचर्चेबाबत इराणी नागरिक संप्तप्त आहेत. एकीकडे इराणचा अणुकार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्याच्या बदल्यात आर्थिक निर्बंधांमधून सवलत मिळावी, यासाठी अमेरिका आणि तेहरानमध्ये चर्चा सुरू होती; तर दुसरीकडे ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत मोठी युद्धनौका आणि लष्करी फौज तैनात केली. जर कोणताही करार झाला नाही, तर शस्त्रास्त्रांच्या जोरावर तोडगा काढला जाईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. यापूर्वी इराणमधील सत्तापालट हीच सर्वात चांगली गोष्ट असेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT