आंतरराष्ट्रीय

US-Iran conflict : भारतीय खलाशाचा मृत्यू, ओमानच्या समुद्रकिनारी तेलवाहू जहाजावर इराणचा भीषण हल्ला

Iran Attacks on Oman : भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना

रणजित गायकवाड

मस्कत : इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. दरम्यान, ओमानमधील 'पोर्ट सुल्तान काबूस'च्या वायव्येस समुद्रात एका तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन बोटीच्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इराण आणि अमेरिकेतील संघर्ष तीव्र झाल्यानंतर भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.

विस्फोटक भरलेल्या 'ड्रोन बोटी'चा वापर

ओमानच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजधानी मस्कतजवळील सागरी क्षेत्रात झाला. 'MKD VYOM' नावाच्या या तेलवाहू जहाजावर मार्शल आयलंड्सचा ध्वज होता. एका मानवरहित विस्फोटक बोटीने या जहाजाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत जहाजावरील एका भारतीय क्रू सदस्याला आपले प्राण गमवावे लागले. जहाजाचे नेमके किती नुकसान झाले आहे आणि इतर किती जण जखमी झाले आहेत, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

बचावकार्य आणि भारतीय दूतावासाची भूमिका

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी जहाजावर एकूण २१ कर्मचारी तैनात होते. यामध्ये १६ भारतीय, ४ बांगलादेशी आणि एका युक्रेनियन नागरिकाचा समावेश होता. ओमानमधील भारतीय दूतावासाने या घटनेला दुजोरा दिला असून ते स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत.

सर्च ऑपरेशन

बेपत्ता असलेल्या क्रू सदस्यांचा शोध घेण्यासाठी ओमानच्या सुरक्षा यंत्रणांकडून व्यापक मोहीम राबवली जात आहे. दूतावासाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही ओमानच्या यंत्रणांशी समन्वय साधून शोध मोहिमेवर लक्ष ठेवून आहोत. तसेच सुरक्षित सुटका करण्यात आलेल्या भारतीय खलाशांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत."

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी व्यापारावर धोक्याचे सावट निर्माण झाले असून, या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT