वॉशिंग्टन/जीनिव्हा : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा स्वित्झर्लंडमधील बुर्गेनस्टॉक रिसॉर्टमध्ये रविवारी सुरू झाली असून त्यासाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळे स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी सांगितले की, गेल्या काही तासांत काही चांगल्या घडामोडी घडल्या आहेत. अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश शांतता व समृद्धीचे नवे युग नांदावे यासाठी वचनबद्ध आहेत.
अमेरिकेच्या शिष्टमंडळात उपाध्यक्ष व्हॅन्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा समावेश आहे. तसेच इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची करत आहेत. तेथील संसदेचे अध्यक्ष बाघर गालिबाफ हेही या चर्चेत सहभागी होतील. पाकिस्तान आणि कतार हे या चर्चेतील मुख्य मध्यस्थ आहेत.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, जर इराणसोबत येत्या ६० दिवसांत कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका भविष्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये टोल लावण्याचा विचार करू शकते. हे शुल्क मध्य पूर्वेतील सुरक्षेवर झालेल्या अमेरिकेच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी असेल. त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केले की, युद्धविरामादरम्यान पुढील दोन महिन्यांत होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर कोणताही टोल लावला जाणार नाही.
एकीकडे शांतता चर्चेच्या हालचालींना वेग आलेला असताना इराणच्या रिव्हॉल्युशनरी फोर्सने जगभरातील जहाजांना होर्मुझजवळून न जाण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही जहाजाने याचे उल्लंघन केले तर त्यांच्या सुरक्षेची कसलीही हमी इराणकडून दिली जाणार नाही.
दरम्यान, युद्धविराम लागू असला तरी इस्रायलने गाझाच्या बुरेज निर्वासित छावणीवर केलेल्या हल्ल्यात सहाजण ठार झाले. त्यामध्ये अल जझीराचा कॅमेरामन अहमद विशाह याचा समावेश आहे. इस्रायलने म्हटले आहे की, विशाह हा हमासच्या लष्करी शाखेशी संबंधित होता. मात्र या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही.