US-Iran Conflict Explained: आज जगात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष. मध्य पूर्वेतील कोणतीही मोठी घटना घडली की या दोन देशांची नावे समोर येतात. पण हा वाद नेमका कधी सुरु झाला? दोन्ही देश एकमेकांचे इतके कट्टर शत्रू कसे बनले? आणि आज परिस्थिती थेट युद्धापर्यंत कशी पोहोचली? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला गेल्या ७० वर्षांचा इतिहास समजून घ्यावा लागेल.
आज जरी दोन्ही देश कट्टर विरोधक असले, तरी एक काळ असा होता की अमेरिका आणि इराण यांचे संबंध अत्यंत चांगले होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इराणमध्ये प्रचंड तेलसाठे सापडले. मात्र या तेलावर नियंत्रण ब्रिटनच्या अँग्लो-इराणियन ऑइल कंपनीचे होते. त्यामुळे इराणची संपत्ती परदेशी कंपन्यांच्या हातात गेली होती. यामुळे इराणमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
१९५१ मध्ये मोहम्मद मोसादेघ इराणचे पंतप्रधान झाले. त्यांनी मोठा निर्णय घेत देशातील तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले. म्हणजेच तेलावरील नियंत्रण परदेशी कंपन्यांकडून काढून ते इराण सरकारकडे आणले. हा निर्णय ब्रिटन आणि अमेरिकेला अजिबात आवडला नव्हता, कारण दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मध्य पूर्वेतील तेलावर अवलंबून होती.
तेलावरील नियंत्रण गमावण्याची भीती वाटू लागल्याने अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA आणि ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने संयुक्तपणे मोसादेघ यांचे सरकार उलथवून टाकले. या लष्करी बंडानंतर शाह मोहम्मद रझा पहलवी हे सत्तेवर आले. अमेरिका हा त्यांचा प्रमुख समर्थक देश बनला. याच घटनेमुळे इराणच्या जनतेमध्ये अमेरिकेविरोधात तीव्र संताप निर्माण झाला. आजही अनेक इराणी नागरिक या घटनेला त्यांच्या देशाच्या इतिहासातील मोठा विश्वासघात मानतात.
१९५७ मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात अणुऊर्जेसाठी करार झाला. अमेरिकेने इराणला अणुऊर्जा तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी मदत केली. पुढे हाच कार्यक्रम अनेक वर्षांनी जगभर वादाचा विषय ठरला.
त्यानंतर १९७९ मध्ये इराणमध्ये मोठी इस्लामिक क्रांती झाली. शाह यांना सत्ता सोडून देश सोडावा लागला आणि आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक रिपब्लिकची स्थापना झाली.
याच काळात इराणमधील आंदोलकांनी अमेरिकेच्या दूतावासावर ताबा मिळवत ५२ अमेरिकी नागरिकांना तब्बल ४४४ दिवस ओलीस ठेवले. या घटनेनंतर अमेरिकेने इराणशी राजनैतिक संबंध पूर्णपणे तोडले. आजपर्यंत दोन्ही देशांमध्ये अधिकृत राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झालेले नाहीत.
१९८० मध्ये इराकने इराणवर हल्ला केला. हे युद्ध तब्बल आठ वर्षे चालले. या युद्धात अमेरिकेने इराकला विविध प्रकारची मदत केली. त्यामुळे इराणचा अमेरिकेवरील राग आणखी वाढला.
१९८८ मध्ये अमेरिकेच्या युद्धनौकेने चुकून इराण एअरचे प्रवासी विमान पाडले. या दुर्घटनेत विमानातील सर्व २९० प्रवाशांचा मृत्यू झाला. अमेरिकेने ही चूक असल्याचे सांगितले, मात्र इराणने याकडे जाणीवपूर्वक केलेला हल्ला म्हणून पाहिले.
२००० नंतर अमेरिकेला संशय येऊ लागला की इराण अण्वस्त्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने इराणच्या काही केंद्रांमध्ये युरेनियमचे अंश सापडल्याचे सांगितले. त्यानंतर इराणवर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आले.
बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया, चीन आणि इराण यांच्यात ऐतिहासिक अणुकरार झाला. या करारानुसार इराणने अणुकार्यक्रमावर मर्यादा घालायच्या आणि त्याबदल्यात आर्थिक निर्बंध शिथिल करण्यात येणार होते. हा करार त्या काळातील सर्वात मोठा करार मानला गेला.
डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हा अणुकरार रद्द केला आणि इराणवर पुन्हा कठोर आर्थिक निर्बंध लादले. यामुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढला.
जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेने इराणचे प्रभावशाली लष्करी अधिकारी जनरल कासेम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्यात ठार केले. इराणने याचा बदला घेत अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. दोन्ही देश प्रत्यक्ष युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला. त्यानंतर मध्य पूर्वेत युद्धाचे वातावरण निर्माण झाले. अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी राहिली, तर इराणवर हमास आणि इतर गटांना पाठिंबा दिल्याचे आरोप झाले. त्यानंतर इराण आणि इस्रायल यांच्यात थेट क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू झाली.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी इराणशी नव्या अणुकरारासाठी चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला. ओमान आणि इटलीमध्ये अनेक फेऱ्यांच्या अप्रत्यक्ष चर्चा झाल्या. मात्र युरेनियमच्या मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही.
चर्चा सुरू असतानाच इस्रायलने इराणवर मोठे हल्ले केले. त्यानंतर अमेरिकेनेही इराणमधील फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या महत्त्वाच्या अणुस्थळांवर हवाई हल्ले केले. अमेरिका म्हणते की हे हल्ले इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी होते, तर इराणने याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आणि प्रत्युत्तर दिले.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही. तेल, अणुऊर्जा, मध्य पूर्वेतील सत्ता, इस्रायलचा प्रश्न आणि जागतिक राजकारण या सर्व गोष्टी या संघर्षाशी जोडलेल्या आहेत.
गेल्या सात दशकांतील प्रत्येक घटना या वादाला अधिक गुंतागुंतीची बनवत आहे. एका बाजूला अमेरिका इराणला अण्वस्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे इराण आपल्या सार्वभौमत्वाचा आणि अणुऊर्जेवरील अधिकाराच्या मुद्द्यासाठी भांडत आहे.
आजही जगभरातील अनेक देश या संघर्षावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण हा संघर्ष आहे त्यापेक्षा आणखी वाढला, तर त्याचा परिणाम केवळ मध्य पूर्वेवरच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्था, तेलाचे दर आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरही होणार आहे.