तेहरान, वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामाची मुदत बुधवारी सकाळी संपणार असून युद्धविरामाला विराम मिळणार आहे. मात्र अद्याप शांतता चर्चेबाबत कोणताही तोडगा रात्रीपर्यंत निघाला नाही. इराणने ट्रम्प यांच्या सातत्याने बदलणार्या भूमिकेवर विश्वास ठेवता येत नाही, असे सांगत चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. धमक्या दिल्या जात असताना वाटाघाटी होऊ शकत नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली; तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम वाढवायचा नाही, असे स्पष्ट केले. याच वेळी त्यांनी बुधवारी करार झाला नाही तर इराणवर मोठे बॉम्ब हल्ले करणार, असा इशाराही दिला.
अमेरिका सध्या वाटाघाटीच्या मजबूत स्थितीत आहे आणि शेवटी एक उत्कृष्ट करार होईल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. ट्रम्प एका वाहिनीशी बोलताना म्हणाले की, करार करण्यासाठी माझ्याकडे जास्त वेळ नाही आणि जर ते वॉशिंग्टनसोबत करारावर सहमत झाले तर तेहरानला खूप चांगल्या स्थितीत जाता येईल. मला बॉम्बहल्ले अपेक्षित आहेत. कारण ती अधिक कठोर भूमिका असेल.
अमेरिका व इराण यांच्यातील संभाव्य शांतता चर्चांबाबत आशा आणि अनिश्चितता एकाच वेळी दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये या चर्चांचे आयोजन होणार असल्याचे संकेत असले तरी प्रत्यक्षात उभय देशांचे प्रतिनिधी मंडळ अजून रवाना झालेले नाही. दरम्यान, एका वरिष्ठ इराणी अधिकार्याने सांगितले की, ते चर्चेत सहभागी होण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे चर्चेच्या यशाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही करारासाठी इराणने अण्वस्त्र विकसित करण्याची क्षमता सोडावी लागेल. जागतिक बाजारातील तेलाच्या किमती व शेअर बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी तो करार लवकर व्हावा, अशी अमेरिकेची भूमिका आहे.
तेल बाजारात चढउतार
चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या आशेने मंगळवारी आशियाई बाजारात तेलाच्या किमती घसरल्या आणि शेअर बाजारात सुधारणा दिसली. ब्रेंट क्रूडचे दर 0.6 टक्क्याने घसरून 94.94 डॉलर प्रति बॅरलवर आले, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 1.2 टक्क्याने कमी होऊन 88.50 डॉलरवर आले. याआधी सोमवारी चर्चांबाबत अनिश्चिततेमुळे तेलाच्या किमती सुमारे सहा टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर या संघर्षाचा थेट परिणाम दिसून येत आहे.
* इराणचे प्रतिनिधी अजून पाकला रवाना झाले नाहीत; चर्चांवर अनिश्चितता
* तेल बाजारात उलथापालथ; जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम
* ‘टौस्का’ जहाज प्रकरणामुळे अमेरिका-इराण तणाव वाढला
* पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी कडेकोट सुरक्षा; कराराबाबत आशा कायम